पंतप्रधान मोदी, राहुल गांधी यांनी केला सन्मान
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी सत्ताधारी एनडीएकडून ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला तर विरोधी पक्षांकडून के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. पण संख्याबळ लक्षात घेऊन कॉंग्रेसने ऐनवेळी माघार घेतली. त्यावेळी बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव आवाजी मतदानाने स्वीकारण्यात आल्याची घोषणा हंगामी अध्यक्ष बर्तृहारी महताब यांनी बुधवार, दि. २६ जून २०२४ रोजी केली. त्यानुसार १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी सत्ताधारी एनडीएकडून ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांचे नाव अध्यक्षपदासाठी मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सत्ताधारी एनडीएच्या १३ घटक पक्षांनी हा प्रस्ताव मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, ललन सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान, जीतनराम मांझी, कुमारस्वामी, चिराग पासवान, सुनील तटकरे, अनुप्रिया पटेल, अन्नपूर्णा देवी यांनी ओम बिर्ला यांच्या अर्जाला अनुमोदन दिले.
के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी मांडला. एन. के. प्रेमचंद्रन, पंकज चौधरी, तारिक अन्वर, सुप्रिया सुळे यांनी अनुमोदन दिले. ओम बिर्ला आणि के. सुरेश यांचे प्रस्ताव सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून मांडण्यात आल्यानंतर हंगामी अध्यक्ष बर्तृहारी महताब यांनी आवाजी मतदान घेतले. आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली.
राजकीय प्रवास
६५ वर्षीय ओम बिर्ला यांनी राजस्थानमधील कोटा येथून भाजपच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष म्हणून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. १९९१ ते १९९७ पर्यंत ते युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि नंतर युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले. बिर्ला यांनी २००३ मध्ये कोटा विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढवली आणि पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्री शांती धारीवाल यांचा १०१०१ मतांनी पराभव केला. त्यानंतर २००८ मध्ये त्यांनी कोटा दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राम किशन वर्मा यांचा २४२५२ मतांनी पराभव केला. २०१३ मध्ये कोटा दक्षिणमधूनही निवडणूक जिंकली. पुढील वर्षी भाजपने कोटा-बुंदी लोकसभा मतदारसंघातून ओम बिर्ला यांना खासदारकीचे तिकीट दिले आणि बिर्ला यांनी थेट २ लाख ७८२ मतांनी पराभव केला. २०१९ मध्येही बिर्ला याच जागेवरून खासदार झाले. यावेळीही येथून खासदारकीची निवडणूक ंिजकून ते लोकसभेत पोहोचले.