तेहरान : इराणमध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत शनिवार, दि. ६ जुलै २०२४ रोजी मसूद पेझेश्कियान यांनी बाजी मारली. मसूद पेझेश्कियान हे देशातील सुधारणावादी नेते म्हणून ओळखले जातात. मसूद यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी आणि कट्टरतावादी नेते सईद जलिली यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. मसूद पेझेश्कियान यांच्याकडे सुधारणांवर विश्वास ठेवणारा नेता म्हणून पाहिले जाते.
यासोबतच पाश्चात्त्य देशांशी संबंध सुधारण्यावरही मसूदचा विश्वास आहे.
तत्कालीन राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्यानंतर इराणमध्ये २८ मे रोजी नव्या राष्ट्राध्यक्षांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान झाले. यानंतर ५ जुलै रोजी झालेल्या दुस-या टप्प्यातील मतदानानंतर मसूद पेझेश्कियान विजयी झाले. आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान, पेझेश्कियान यांनी देशातील कठोर हिजाब कायदा सुलभ करण्याचे आश्वासन दिले होते. पेझेश्कियान यांनी १९९७ मध्ये इराणचे आरोग्य मंत्री म्हणून काम केले आहे.
मसूद पेझेश्कियान?
२९ सप्टेंबर १९५४ रोजी जन्मलेले मसूद पेझेश्कियान हे व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि ते इराणच्या तबरीझ मेडिकल युनिव्हर्सिटीचे प्रमुख आहेत. १९९४ मध्ये मसूद पेझेश्कियानची पत्नी आणि मुलगी एका कार अपघातात ठार झाली. पेझेश्कियान हे १९९७ मध्ये इराणचे आरोग्य मंत्रीही होते. दरम्यान, मसूद पेझेश्कियान यांनी २०११ मध्येही इराणच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल केले होते, परंतु नंतर त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. ते माजी राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्या जवळचे मानले जातात.