पॅरिस ऑलिंपिकसाठी ११३ भारतीय खेळाडू सज्ज

yongistan
By - YNG ONLINE
पॅरिस : वृत्तसंस्था 
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. पॅरिस ऑलिम्पिक २६ जुलैपासून सुरू होणार असून ११ ऑगस्टपर्यंत हा थरार चालणार आहे. येथे जगातील १० हजारांहून अधिक खेळाडू पदक जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. यामध्ये ११३ भारतीय खेळाडूंचा सहभाग असणार आहे. एकूण १६ खेळांमध्ये हे खेळाडू खेळणार आहेत. भारताला नीरज चोप्रा ते मीराबाई चानू आणि निखत झरीन तसेच पीव्ही सिंधूसह नव्या दमाच्या क्रीडापटूंकडून पदकांची अपेक्षा आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत ३५ पदके जिंकली आहेत. यंदा भारतीयांकडून ब-याच अपेक्षा आहेत.  
ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताने एकूण ३५ पदके जिंकली. यामध्ये १० सुवर्ण, ९ रौप्य आणि १६ कांस्यपदकांचा समावेश होता. २०२० मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सर्वाधिक ७ पदके जिंकली होती. ज्यामध्ये १ सुवर्णपदक होते. खेळाडू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. यावेळीही भारतातील प्रतिभावान खेळाडूंची पॅरिस ऑलिम्पिकसाठी निवड करण्यात आली असून, आता हे भारतीय खेळाडू इतिहास रचण्यासाठी सज्ज झाले आहेत. 
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्ससाठी भारताच्या नीरज चोप्रा, किशोर जेना, अब्दुल्ला अबुबकर, मोहम्मद अनस, मुहम्मद अजमल, अक्षदीप सिंग, विकास सिंग, परमजीतसिंग बिश्त, प्रियांका गोस्वामी, अविनाश साबळे, पारुल चौधरी, ज्योती याराजी, किरण पहल, तेजिंदरपालसिंग तूर, आभा खटुआ, अनू राणी, सर्वेश कुशारे, प्रवीण चित्रवेल, अमोज जेकब, संतोष तमिलरासन, राजेश रमेश, मिझो चाको कुरियन, विद्या रामराज, ज्योतिका श्री दांडी, एमआर पूर्वम्मा, सुभा व्यंकटेशन, प्राची, सूरज पवार, जेसविन आल्ड्रिन, किरण पाल यांची निवड केली आहे.
हॉकीसाठी पीआर श्रीजेश, जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), सुमित, संजय, राजकुमार पाल, शमशेर सिंग, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, अभिषेक, सुखजीत सिंग, ललित कुमार उपाध्याय, मनदीप सिंग, गुजरंत सिंग हा संघ मैदानात उतरणार आहे. शूटिंगसाठी मनू भाकेर, ईशा सिंग, अंजुम मौदगिल, ऐश्वर्या प्रताप तोमर, राजेश्वरी कुमारी, श्रेयसी सिंग, अनंतजीत सिंग, रयझा धिल्लॉन, माहेश्वरी चौहान, संदीप सिंग, अर्जुन बाबौता, एलेनविल वालारिवन, रमिता जिंदाल, स्वप्नील कुसले, सिफ्टी कुसले, आर. सांगवान, सरबज्योत सिंग, अर्जुन सिंग चीमा यांची निवड केली आहे.

मुख्य प्रतिस्पर्धी देश
दक्षिण कोरिया, संयुक्त राष्ट्र, फ्रान्स, इटली, ग्रेट ब्रिटन,
चायनीज तैपेई, मेक्सिको या देशातील क्रीडापटू भारतीय क्रीडापटूंचे प्रतिस्पर्धी असतील. ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले सर्वच देशाचे खेळाडू सध्या सरावात मग्न आहेत.