नेपाळच्या पंतप्रधानपदी ओली

yongistan
By - YNG ONLINE
काटमांडू : वृत्तसंस्था
नेपाळमध्ये नवे सरकार आले आहे. कम्युनिस्ट नेता केपी शर्मा ओली हे नवे पंतप्रधान झाले आहेत. त्यांनी सोमवार, दि. १५ जुलै २०२४ रोजी तिस-यांदा नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. केपी शर्मा ओली यांना चीन समर्थक मानले जाते. 
केपी ओली यांचे भारतासोबतचे संबंध काहीसे विरोधी आहेत. त्यांनी भारताचे अनेक भूभाग नेपाळच्या नकाशामध्ये दाखवले होते. यावरून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. ओली हे तीनवेळा पंतप्रधान झाले. ऑक्टोबर २०१५ ते ऑगस्ट २०१६ या काळात पहिल्यांदा आणि फेब्रुवारी २०१८ ते जुलै २०११ अशा काळात त्यांनी दुस-यांदा पंतप्रधानपदाचा कार्यभार सांभाळला.

ओली यांचा दुसरा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी त्यांची केलेली नियुक्ती सुप्रीम कोर्टाने असैंविधानिक ठरवली होती. त्यामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले होते. पण, त्यांनी पुन्हा सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले. केपी ओली यांनी शेर बहादुर देऊबा यांच्या नेपाली काँग्रेस पार्टीच्या पाठिंब्याने नवे सरकार स्थापन केले आहे.
राष्ट्रपतींनी केपी ओली यांना विश्वास दर्शक ठराव सिद्ध करण्यात सांगितले होते. नेपाळची संसद २७५ सदस्यांची आहे. यातील १६५ सदस्यांनी त्यांच्या नव्या सरकारच्या बाजूने समर्थन दिलं आहे. ओली यांची नवी कारकीर्द भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते. २०१५ मध्ये पहिल्यांदा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी भारताविरोधात काही निर्णय घेतले होते. नेपाळमध्ये २००८ मध्ये राजेशाही संपली. त्यानंतर आतापर्यंत तब्बल १३ सरकारे स्थापन झालेले आहेत. केपी ओली ७२ वर्षांचे आहेत. त्यांच्याकडून नेपाळच्या जनतेला फार अपेक्षा आहेत.