ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी, तिरंदाजीत पदकाच्या आशा!
पॅरिस : वृत्तसंस्था
पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताची सुरुवात शनिवार, दि. २७ जुलै २०२४ रोजी तिरंदाजीतील लढतीने झाली. तिरंदाजीच्या रँकिंग राऊंडमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघाने टॉप ४ मध्ये स्थान मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. महिला आणि पुरुष संघांनेही उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यामुळे पदकाच्या आशा उंचावल्या आहेत. दरम्यान, भारतीय नेमबाज मनू भाकर १० मीटर एअर पिस्टल महिलांच्या अंतिम फेरीत दाखल झाली. त्यामुळे पिस्टल स्पर्धेत पदक जवळपास निश्चित झाले आहे. उद्या हा सामना होणार आहे. दरम्यान, भारताची दुसरी नेमबाज रिदिमा सांगवान स्पर्धेतून बाहेर पडली.
भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरी गाठली. मनू भाकरच्या यशामुळे तब्बल २० वर्षांनी भारताची महिला नेमबाज अंतिम फेरीत पोहोचली. आता उद्या अंतिम फेरीत ८ नेमबाज ३ पदकांसाठी लढणार आहेत. या अगोदर २००४ मध्ये अॅथेन्स ऑलिम्पिकमध्ये नेमबाज सुमा शिरुर १० मीटर एअर पिस्टल महिला गटात अंतिम फेरीत पोहोचली होती.
दरम्यान, तिरंदाजीतील धीरज बोम्मादेवरा, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव यांनी २०१३ गुण मिळवत तिस-या स्थानी झेप घेतली. आता भारताचा सामना तुर्की आणि कोलंबिया यांच्यातील विजेत्या संघासोबत होणार आहे. तुर्कीच्या संघाने ६ वे तर कोलंबियाने ११ वे स्थान मिळवले. १२ व्या स्थानावर असलेल्या संघाला उपांत्यपूर्व फेरीपूर्वी एका सामन्यात विजय मिळवत टॉप ८ मध्ये स्थान मिळवावे लागते. तिरंदाजीत सुवर्णपदकासाठी २९ जुलै रोजी सामना रंगणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक तिरंदाजीत मिळू शकते. दुसरीकडे महिला तिरंदाजीतही भारताला पदक मिळण्याची शक्यता आहे.
बॅडमिंटन, टेबल
टेनिसमध्ये विजय
भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने विजयी सुरुवात केली. लक्ष्यने पुरुष एकेरीच्या लढतीत केविन कॉर्डनचा पराभव केला. दुसरीकडे सात्विक-चिराग या पुरुष दुहेरी जोडीनेही विजय मिळविला. त्यांनी फ्रेंच जोडी कोरवी आणि लाबर जोडीचा सलग सेटमध्ये एकतर्फी पराभव केला. टेबल टेनिसमध्ये हरमीत देसाईने एकतर्फी विजय मिळवित दुस-या फेरीत प्रवेश केला. त्याने जॉर्डनच्या झायेद अबो यामनला धूळ चारली. मात्र, टेनिस दुहेरीचा सामना पुढे ढकलला असून, रविवारी हा सामना होणार आहे.
हॉकी संघाचीही विजयी सलामी
भारतीय पुरुष हॉकी संघाचीही विजयी सुरुवात झाली आहे. ब गटातील पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ३-२ असा पराभव केला. ०-१ ने पिछाडीवर असूनही भारताने शानदार विजय मिळवला. या विजयामुळे भारताचे ३ गुण झाले आहेत.