पंतप्रधानांच्या भेटीनंतर टीम इंडिया मुंबईत, स्वागतासाठी अलोट गर्दी
मुंबई : प्रतिनिधी
अभूतपूर्व कामगिरी करून टी-२० वर्ल्ड कप जिंकणारा भारतीय संघ अखेर ४ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवार, दि. ४ जुलै २०२४ रोजी सकाळी मायदेशात परतला. त्यामुळे भारतीय संघासाठी आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहावा असाच ठरला. कारण सकाळी दिल्लीत दाखल झाल्यापासून ते मुंबईच्या वानखेडे स्टेडियमपर्यंत संपूर्ण देश टीम इंडियामय झाला. टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उसळलेला चाहत्यांचा महासागर आणि त्यांचा जयघोष अत्यंत भावस्पर्शी ठरला. लाखो क्रिकेट चाहत्यांच्या साक्षीने आज चॅम्पियन्सचा गौरव करण्यात आला. या अनोख्या सन्मानाने भारतीय क्रिकेटपटू भारावून गेले.
अभूतपूर्व कामगिरी करून टी-२० वर्ल्डकप जिंकणारा भारतीय संघ अखेर चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी मायदेशात दाखल झाला. संघाने भारतात दाखल झाल्यानंतर प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि तब्बल सव्वा तास त्यांच्या सहवासात राहून संवाद साधला. त्यानंतर टीम इंडिया मुंबईसाठी रवाना झाली. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर दाखल होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. विमानात असतानाच प्रथम पाण्याचा फवारा मारून टीम इंडियाला सलामी देण्यात आली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले आणि टीम इंडियाचा थेट मरिन ड्राईव्ह येथून उघड्या बसने वानखेडे स्टेडियमपर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
ओपन डक बसमधून खेळाडूंनी चाहत्यांचे अभिवादन स्विकारले. त्यानंतर वानखेडेवर दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंनी मैदानातच जबदरस्त डान्स करत उपस्थित फॅन्समध्ये ऊर्जा भरली. संपूर्ण वानखेडे स्टेडियम क्रिकेटप्रेमींच्या उपस्थितीने खचाखच भरले होते. ढोल ताशाच्या गजरात हे खेळाडू बेभान होऊन नाचले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात वानखेडेवर जय शाह यांनी टीम इंडियाकडे १२५ कोटींचा चेक सुपूर्द केला.
आयसीसी करणार
रोहित, बुमराहचा सन्मान
टी-२० वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा ३६.७१ च्या सरासरीने आणि १५६.७० च्या स्ट्राइक रेटसह २५७ धावा करून स्पर्धेतील दुसरा सर्वोच्च धावा करणारा खेळाडू ठरला. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४१ चेंडूत ९२ आणि इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत ३९ चेंडूत ५७ धावा केल्या होत्या. तसेच मालिकावीर बुमराहने ८ सामन्यांत १५ बळी घेतले. पाकिस्तानविरुद्धचा महत्त्वपूर्ण स्पेल आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात निर्णायक कामगिरीसह त्याने टायमिंगवर घेतलेल्या विकेट भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरल्या. अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज जो २८१ धावांसह अव्वल स्थानी आहे.