विनेश फोगटचे स्वप्न भंगले

yongistan
By - YNG ONLINE
वजन अधिक, अंतिम लढतीसाठी अपात्र, क्रीडा कोर्टात धाव 
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिच्या अपात्रतेच्या निर्णयाने बुधवार, दि. ७ ऑगस्ट २०२४ चा दिवस गाजला. या आधी मंगळवारी ५० किलो वजनी गटात सलग तीन बाऊट जिंकून फायनलमध्ये धडक देणा-या विनेशचे पदकाचे स्वप्न भंगले. १०० ग्रॅम अधिक भार तिला थेट पहिल्या बाकावर नेऊन बसविणारा ठरला. जागतिक कुस्ती महासंघ आणि ऑलिम्पिक समितीच्या या निर्णयाला भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून आव्हान देण्यात येणार आहे. दरम्यान, विनेश फोगटने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे धाव घेत रौप्य पदकाची मागणी केली आहे.
संयुक्त रौप्य पदक मिळावे, अशी मागणी विनेश फोगटने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे (सीएएस) केली आहे. लवादाने फोगटच्या बाजूने निर्णय घेतल्यास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला विनेशला संयुक्त रौप्यपदक द्यावे लागेल. आता सीएएस या प्रकरणावर गुरुवार, दि. ८ ऑगस्टला अंतिम निर्णय देणार आहे. विनेश फोगट ५० किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. तिचे वजन ५० किलोपेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तिला अंतिम फेरीत अपात्र ठरवण्यात आले. स्पर्धेच्या नियमांनुसार स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु तिचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याने ती रौप्य आणि कांस्य पदकासाठीही पात्र ठरू शकली नाही. 
तत्पूर्वी विनेश फोगटचे वजन जास्त असल्याचे लक्षात येताच मंगळवारी रात्रभर भारतीय पथकाकडून हालचाली सुरू होत्या. मात्र, बुधवारी सकाळी झालेल्या तपासणीत फोगटचे वजन ५० किलोपेक्षा १०० ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. त्यामुळे तिला अंतिम लढतीला मुकावे लागले. त्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि भारताकडे काय पर्याय आहेत, याबद्दल प्राथमिक माहिती घेतली. त्यानंतर पी. टी. उषा यांनी थेट रुग्णालयात धाव घेऊन विनेशची भेट घेऊन धीर दिला. आता या निर्णयाला भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून आव्हान देण्यात येणार आहे.
फोगटची प्रकृती बिघडली
या घटनाक्रमानंतर विनेश फोगटची प्रकृती बिघडली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. वजन कमी राहण्यासाठी विनेशने खाण्या-पिण्याचे प्रमाण कमी केले. त्यामुळे तिच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले असून तिला डिहायड्रेशनचा त्रास जाणवू लागला. पाण्याची कमतरता, डिहायड्रेशनमुळे ती बेशुद्ध पडली. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.

असा आहे नियम
यूनाइटेड वर्ल्ड रेसिलिंगच्या नियमांनुसार एखादा कुस्तीपटू वजन मोजण्यासाठी सहभागी झाला नाही किंवा अयशस्वी झाला तर तो स्पर्धेतून बाहेर होतो. तसेच त्या खेळाडूला कोणत्याही क्रमवारीशिवाय शेवटच्या स्थानावर ठेवले जाते.

नियम बदला 
विनेश फोगटच्या बाबतीत कुस्तीबाबतच्या जागतिक नियमांत बदल करून तिला रौप्य पदक देण्यात यावे, अशी मागणी अमेरिकेचा पहेलवान जार्डन बरोज याने केली आहे. त्यामुळे या मुद्यावरून आता जागतिक स्तरावर आवाज उठवला जात असून, याला बजरंग पुनिया, गीता फोगटनेही साथ दिली आहे.

सीएएस कोर्टात आव्हान
आता संयुक्त रौप्य पदक मिळावे, अशी मागणी विनेश फोगटने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे (सीएएस) केली आहे. लवादाने फोगटच्या बाजूने निर्णय घेतल्यास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला विनेशला संयुक्त रौप्यपदक द्यावे लागेल. आता सीएएस या प्रकरणावर गुरुवारी ८ ऑगस्टला अंतिम निर्णय देणार आहे.