- या योजनेचा अन्य कोणत्याही योजनांवर परिणाम नाही : मुख्यमंत्री
मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आजपर्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात १ कोटी ५९ लाख भगिनींना ४७८७ कोटींचा लाभ देण्यात आला आहे. जुलै आणि ऑगस्ट अशी एकत्रित ३ हजार रुपयांची रक्कम डीबीटीद्धारे थेट खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. या योजनेसाठी निधीची स्वतंत्र तरतूद करण्यात आली असल्याने सरकारच्या अन्य कोणत्याही योजना थांबणार नाहीत. त्या पूर्ववत सुरू राहतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
गुरुवार, दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यात आला. या योजनेत आजपर्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात १ कोटी ५९ लाख भगिनींना ४७८७ कोटींचा लाभ देण्यात आला आहे अशी माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. जुलै आणि ऑगस्ट अशी एकत्रित ३ हजार रुपयांची रक्कम डीबीटीद्धारे थेट खात्यात जमा करण्यात आली आहे. या योजनेत अडीच कोटी महिला लाभार्थींना लाभ देण्याचे उद्दीष्ट आहे. त्यामुळे अर्ज घेण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत चालू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. नवी मुंबई येथे अर्ज भरतांना केलेल्या गैरप्रकारासाठी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.