पालघर : महाराष्ट्रासह देशाच्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोलाचे ठरणा-या वाढवण बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी झाले. या बंदरामुळे जगातील पहिल्या १० कंटेनर पोर्टच्या यादीत भारताचे नाव समाविष्ट होणार आहे.
या प्रकल्पामुळे राज्यात आर्थिक विकासाला चालना मिळणार असून १२ लाखांपेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळणार आहे.
७६,२०० कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदराचा पायाभरणी समारंभ आणि १५६३ कोटी रुपयांच्या मत्स्यव्यवसाय प्रकल्पाचे व योजनांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधील सिडको मैदानात पार पडले. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय बंदर विकास मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय मत्स्यव्यवसायमंत्री राजीव रंजन सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय बंदरे जहाज आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनेवाल यांनी वाढवण बंदर हे महाराष्ट्रासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून अमूल्य अशी भेट आहे. या बंदराच्या निर्मितीमुळे स्थानिकांना रोजगार आणि देशाला व्यापार उपलब्ध होणार आहे. हे जगातले आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवासुविधांनी परिपूर्ण असे बंदर असणार आहे. या बंदराच्या निर्मितीत एक लाख लोकांना रोजगाराची संधी मिळेल, बंदर पूर्ण तयार झाल्यानंतर दहा ते बारा लाखाहून अधिक रोजगार निर्माण होतील, असे म्हटले तर केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंह यांनी मत्स्यउत्पादन संबंधित १५८४ करोड रुपये योजनांचा आरंभ करण्यात आला. यातून ५ लाख २५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणी शिवप्रेमींची माफी मागितली.