दीप्ती जीवनजीला कांस्यपदक

yongistan
By - YNG ONLINE
पॅरिस : पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतील सहावा दिवस म्हणजे मंगळवार दि. ३ सप्टेंबर २०२४ चा दिवस भारतीयांसाठी खास राहिला नाही. पण रात्री पदकाचे खाते उघडले आणि दीप्ती जीवनजीने महिलांच्या ४०० मीटर टी २० शर्यतीत ५५.८२ सेकंदाची वेळ नोंदवून कांस्यपदक नावावर केले. भारताचे हे पॅरालिम्पिक स्पर्धेतील १६ वे पदक ठरले. २० वर्षीय दीप्ती ही भारतासाठी ट्रॅक अँड फिल्डमध्ये पदक जिंकणारी युवा खेळाडू ठरली.
नेमबाजीत ५० मीटर थ्री पोझिशन एसएच १ मध्ये अवनी लेखराने सातव्या क्रमांकासह अंतिम फेरीत प्रवेश मिळवला, मोना अगरवाल अपयशी ठरली. पण फायनलमध्ये अवनीला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या गोळाफेक एफ ३४ फायनलमध्ये भाग्यश्री जाधव पाचवी आली. तिरंदाजीत पूजाने वैयक्तिक रिकर्व्ह गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला खरा, परंतु तिचा प्रवास तिथेच संपला.
महिलांच्या ४०० मीटर टी २० फायनलमध्ये दीप्ती जीवंजीकडून भारताला सुवर्णपदकाच्या आशा होत्या. या स्पर्धेतील वर्ल्ड रेकॉर्ड कालपर्यंत दीप्तीच्या (५५.०७ सेकंद) नावावर होता. काल टर्कीच्या एसेल ओंडरने ५४.९६ सेकंदाची वेळ नोंदवून तो स्वत:च्या नावावर केला. मागील दोन वर्षांत तिने घवघवीत यश मिळवले आहे. २०२३ च्या आशियाई स्पर्धेत तिने आशियाई रेकॉर्डसह सुवर्णपदक जिंकले तर २०२४ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड मोडून सुवर्ण जिंकले होते.