नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एअर मार्शल अमरप्रीत सिंह हे भारताचे नवे एअर चीफ मार्शल होणार आहेत. यासंबंधीची घोषणा शनिवार, दि. २१ सप्टेंबर २०२४ रोजी केली. विद्यमान वायूसेनाप्रमुख विवेक राम चौधरी ३० सप्टेंबर २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यादिवशी अमरप्रीत सिंह नवे हवाई दलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील. सिंह सध्या वायूसेनेचे उपप्रमुख आहेत.
२७ ऑक्टोबर १९६४ रोजी जन्मलेले एअर मार्शल सिंग यांना डिसेंबर १९८४ मध्ये भारतीय हवाई दलाच्या फायटर पायलट स्ट्रीममध्ये नियुक्त करण्यात आले. सुमारे ४० वर्षांच्या प्रदीर्घ आणि प्रतिष्ठित सेवेदरम्यान त्यांनी विविध कमांड, कर्मचारी, निर्देशात्मक आणि परदेशी नियुक्तींमध्ये काम केले. त्यांनी १ फेब्रुवारी २०२३ ला भारताच्या वायूसेनेचे ४७ वे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. अमरप्रीत सिंह यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमी, खडकवासला आणि एअरफोर्स अकॅडमी, डुंडीगल येथून प्रशिक्षण घेतले. नवी दिल्लीच्या नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्येदेखील त्यांनी प्रशिक्षण घेतले.
५ हजार तासांवर
उड्डाणाचा अनुभव
अमरप्रीत सिंह हे नॅशनल डिफेन्स अकादमी, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी असून एक पात्र फ्लाइंग इंस्ट्रक्टर आणि एक प्रायोगिक चाचणी पायलट आहेत. त्यांना विविध प्रकारच्या स्थिर आणि रोटरी-विंग विमानांवर ५ हजार तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे.