नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जागतिक भ्रष्टाचार विरोधी कक्ष ‘ग्लोब-ई’ च्या सुकाणू समितीत भारताचा समावेश झाला आहे. मतदानाच्या अनेक फे-यांनंतर भारताची निवड करण्यात आली. या कक्षाचे कार्यालय चीनची राजधानी बिजींगमध्ये आहे. या संस्थेत १२१ देशांचा समावेश आहे. तसेच २९१ प्राधिकारणांचाही समावेश करण्यात आला आहे. सध्या या कक्षाचे पाचवे महाअधिवेशन बीज्ािंगमध्ये होत आहे.
या कक्षाचे पूर्ण नाव ‘ग्लोबल ऑपरेशनल नेटवर्क ऑफ अँटिकरप्शन लॉ एन्फोर्समेंट अॅथोरिटीज’ असे आहे. केंद्रीय गुन्हा अन्वेषण संस्था सीबीआयने भारताच्या समावेशाचे स्वागत केले आहे. आता भारताचा गृहविभाग हा या कक्षाचे केंद्रीय प्राधिकरण म्हणून, तर सीबीआय आणि प्रवर्तन निदेशालय किंवा ईडी या भारताच्या सदस्य संस्था या कक्षाच्या सदस्य संस्था म्हणून काम करणार आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहविभागाकडून देण्यात आली आहे. ‘ग्लोब-ई’ या कक्षाचा प्रारंभ जून २०२१ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेच्या विशेष सत्रात करण्यात आला होता. भ्रष्टाचार विरोधासाठी हे विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. जगभरात भ्रष्टाचाराला आळा घालणे हा या कक्षाच्या स्थापनेचा प्रमुख हेतू आहे.