सुनिता विल्यम्स पृथ्वीवर परतणार

yongistan
By - YNG ONLINE
‘स्पेसएक्स’च्या क्रू-९ चे यशस्वी प्रक्षेपण
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था 
सुनीता विल्यम्स यांच्या परतीच्या मार्गात एकापाठोपाठ एक अडचणी येत होत्या. अमेरिकेत चक्रीवादळाचा धोका असल्याने नासा आणि स्पेसएक्सने फ्लोरिडामधील केप कॅनवेरल येथून क्रू-९ चे होणारे प्रक्षेपण पुढे ढकलले होते. मात्र, रविवार, दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी क्रू-९ चे प्रक्षेपण यशस्वीरीत्या पार पडले आहे. त्यामुळे मूळ भारतीय असलेल्या अमेरिकेतील अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर पृथ्वीवर परतण्याचा मार्ग सोपा झाला आहे.

नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर यांच्या यानात बिघाड झाल्याने त्यांच्या परतीच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या. त्यांना परत आणण्यासाठी नासाचे प्रयत्न सुरू आहेत. क्रू-९ हे २६ सप्टेंबर रोजी प्रक्षेपित होणार होते; मात्र वादळामुळे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले होते. क्रू ड्रॅगन हे ‘स्पेसएक्स’कडील ड्रॅगन स्पेसक्राफ्टच्या दोन प्रकारांपैकी एक आहे. स्पेसएक्सच्या क्रू-९ मध्ये अमेरिकेतील अंतराळवीर निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्हला आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावर पाठविण्यात आले आहे. 

फेब्रुवारीअखेर पृथ्वीवर परतणार
विल्यम्स आणि विल्मोर फेब्रुवारी २०२५ मध्ये ड्रॅगन क्राफ्टमध्ये बसून हेग आणि गोर्बुनोवसह परतणार आहेत. स्पेसएक्स वेबसाइटनुसार ते क्रू ड्रॅगनवर स्वायत्तपणे अनडॉक करतील, अंतराळ स्थानक सोडतील आणि पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतील. ते फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर पोहोचल्यानंतर स्पेसएक्स रिकव्हरी जहाज स्पेसक्राफ्ट आणि क्रू यांना घेऊन येईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.