एनव्हीएस-2 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

yongistan
By - YNG ONLINE
श्रीहरिकोटा
आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील ‘इस्रो’च्या ‘एनव्हीएस-०२’ या दळणवळण उपग्रहाचे बुधवार, दि. २९ जानेवारी २०२५ रोजी पहाटे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या प्रक्षेपणाने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) दिमाखदारपणे शतकी कामगिरी पूर्ण केली. व्ही नारायणन यांनी १६ जानेवारीला ‘इस्रो’ची सूत्रे हाती घेतल्यानंतरही ही पहिलीच मोहीम आहे.
५०.९ मीटर उंचीचे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान (जीएसएलव्ही-एफ १५) प्रक्षेपक २९ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ६.२३ या नियोजित वेळेत अवकाशात झेपावले. काळोख्या आणि ढगाळ आकाशात १९ मिनिटे प्रवास केल्यानंतर रॉकेटपासून पेलोड यशस्वीपणे वेगळे झाले. याच्या वरील टप्प्याचे क्रायोजेनिक इंजिन स्वदेशी बनावटीचे आहे. 
दळणवळण मालिकेतील दुसरा उपग्रह
‘एनव्हीएस-०२’ हा भारतीय प्रादेशिक दळणवळण उपग्रह मालिकेतील (एनएव्हीआयसी) दुसरा उपग्रह आहे. भारतीय भूभागापलीकडे दीड हजार किलोमीटरपर्यंत हा उपग्रह सेवा पुरवणार असून त्यामुळे भारतीय उपखंडातील नागरिकांना अचूक स्थान, वेग, वेळ मिळणार आहे. या अगोदर ‘जीएसएलव्ही-एफ-१२’ मधून २९ मे २०२३ रोजी ‘एनव्हीएस-०१’ हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला होता. ‘एनएव्हीआयसी’मध्ये दुस-या पिढीच्या पाच उपग्रहांचा समावेश आहे. ‘एनव्हीएस-०१’ पासून ‘एनव्हीएस-०५’ अशी या उपग्रहांची नावे आहेत. या उपग्रहांमुळे अत्याधुनिक यंत्रणा तयार होणार आहे.

उपग्रहाची वैशिष्ट्ये
-‘एनव्हीएस-०२’ उपग्रहाची रचना आणि निर्मिती यू. आर. उपग्रह केंद्रामध्ये झाली आहे. २,२५० किलो उपग्रहाचे वजन आहे.
-भूभागावर, हवाई आणि सागरी, कृषी क्षेत्रात अचूक वेळ, वेग सांगण्यासाठी याचा उपयोग होईल. मोबाइलमध्ये लोकेशन अचूक दाखविण्यासाठी त्याचा उपयोग होईल.