ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक रा. रं. बोराडे यांचे निधन

yongistan
By - YNG ONLINE
विपूल साहित्य लेखन, पाचोळाकार म्हणून स्वतंत्र ओळख

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठी साहित्यातील कथाकार, कादंबरीकार विशेषत: ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक पाचोळाकार रावसाहेब रंगराव बोराडे ऊर्फ रा. रं. बोराडे यांचे मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. मराठी साहित्यात त्यांनी विपूल लेखन केले असून, साधी-सोपी आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी शैली हे त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्ये आहे. पाचोळा या त्यांच्या प्रसिद्ध कादंबरीमुळे त्यांची पाचोळाकार म्हणून ओळख निर्माण झाली. त्यांच्या निधनाने मराठवाड्यातील साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
रा. रं. बोराडे यांना मागील आठवड्यातच राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता. आमदार सौभाग्यवती ही कादंबरीही त्यांनी लिहिली आहे. त्यावर नाटकही आले आहे. चारापाणी या कादंबरीला १९९० चा मराठवाडा साहित्य परिषदेचा कै. नरहर कुरुंदकर पुरस्कार मिळाला.  कणसं आणि कडबा, पेरणी, ताळमेळ, मळणी, नातीगोती, खोळंबा आदी कथासंग्रहासह शिका तुम्ही हो शिका ही बालकादंबरी, रहाट पाळणा आदी साहित्य बोराडे यांच्या लेखणीतून उतरले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य ते अध्यक्ष, ग्रामीण साहित्य परिषदेचे अध्यक्ष, १९८९ साली हिंगोली येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आदी अनेक पदे त्यांनी भूषवली. तसेच अनेक मान-सन्मानानेही त्यांना गौरवण्यात आले.
रा. रं. बोराडे यांचा जन्म २५ डिसेंबर १९४० रोजी लातूर तालुक्यातील ‘काटगाव’ या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. काटगाव येथे चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षण माढा, बार्शी, सोलापूर, छ. संभाजीनगर अशा शहरात झाले. १९६३ साली रा. रं. बोराडे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैजापूर येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९७१ पासून पुढे काही काळ ते त्या कॉलेजचे प्राचार्य होते. नंतर ते नामांकित समजल्या जाणा-या छ. संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य बनले. ते श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी येथेही प्राचार्य राहिलेले आहेत. २००० साली त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्याच वर्षी राज्य सरकारने त्यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक केली.
 १९५७ साली त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. १९६२ साली आलेल्या पेरणी ते ताळमेळ, मळणी, वाळवण, राखण, गोंधळ, माळरान, बोळवण, वरात, फजितवाडा, खोळंबा, बुरुज, नातीगोती, हेलकावे, कणसं आणि कडबा यासारख्या कथासंग्रहानी मराठवाड्यातील कष्टाची माणसे उभी राहिली. याच काळात कांदबरी, नाट्य, विनोदी, समीक्षा आणि बालसाहित्य अशा बहुअंगी लेखनातून ग्रामसमुहातील माणसे त्यांनी उभी केली. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.