अपघातग्रस्तांवर आता कॅशलेस उपचार

yongistan
By - YNG ONLINE
मुंबई : राज्याच्या आरोग्य खात्याने अपघातग्रस्त रुग्णांसाठी १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करता येणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच कॅशलेस उपचार मिळावेत, यासाठी रुग्णालये, सोसायटीचे अधिकारी व अंमलबजावणी संस्थांनी कठोर दक्षता बाळगावी. यात गैरप्रकार केल्यास कठोर कारवाई होईल. अपघातग्रस्तांना १ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार अंगीकृत व अन्य तातडीच्या रुग्णालयांमधून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. 
राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वरळी, मुंबई येथील मुख्यालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनांच्या कामकाजाचा आढावा आरोग्यमंत्री  प्रकाश आबिटकर घेतला. या बैठकीस आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दयानंद जगताप, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसचिव अशोक आत्राम, सहायक संचालक डॉ. रविंद्र शेटे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जनतेसाठी योजनेतील रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र मोबाईल अ‍ॅप विकसित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. प्रत्येक अंगीकृत रुग्णालयाने दर महिन्याला एक आरोग्य शिबिर आयोजित करून किमान ५ रुग्णांवर कॅशलेस उपचार करावेत, अशा शिबिरात लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेऊन त्याची पूर्वप्रसिद्धी करावी, असे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी यावेळी सांगितले. योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर समित्या स्थापन करून त्यांच्या बैठका त्वरित आयोजित करण्यात येणार आहेत.
स्वतंत्र मोबाईल अ‍ॅप 
करणार विकसित
जनतेला योजनेतील रुग्णालयांची माहिती मिळावी, बेडची उपलब्धता कळावी आणि तक्रारी नोंदवता याव्यात, यासाठी स्वतंत्र मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात येणार आहे. यासंबंधीचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.