मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे नवनियुक्त मुख्य माहिती आयुक्त म्हणून राहुल पांडे यांनी सोमवार, दि. २१ एप्रिल २०२५ रोजी आपल्या पदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पांडे यांना मुख्य माहिती आयुक्तपदाची शपथ दिली. रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर आणि गजानन निमदेव यांनाही या वेळी राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ देण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजभवन येथे हा छोटेखानी शपथविधी समारंभ पार पडला. सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे तसेच इतर माहिती आयुक्त यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखवली. त्यानंतर शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत आणि राज्य गीताने झाली तसेच समारोप राष्ट्रगीताने झाला.