मुंबईत सीएसएमटीवर कडेकोट बंदोबस्त

yongistan
By - YNG ONLINE
हालचालींवर १० हजार सीसीटीव्ही कॅमे-यांची नजर
मुंबई : प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात २७ नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई हाय अलर्टवर आली असून  मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर सतर्कता वाढवण्यात आली. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त वाढविण्यात आला. तसेच रेल्वे पोलिसांकडून रूट मार्च करण्यात आला. दरम्यान, रेल्वे स्टेशन परिसरातील १० हजार सीसीटीव्ही कॅमे-यांच्या माध्यमातूनही नजर ठेवली जात आहे.
मुंबईतील सीएसएमटी हे मुंबईतील एक प्रमुख आणि अत्यंत वर्दळीच रेल्वे स्थानक आहे. या स्थानकावरून रोज लाखो प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मुंबईत स्टेशनवर बंदोबस्त वाढवला आहे. मुंबईत एकेकाळी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणला. त्यानंतर २६/११ चा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. पहलगाम येथील हल्ल्यानंतर अतिरेक्यांकडून पुन्हा मुंबईला लक्ष्य केले जाऊ शकते. कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे हल्ल्याची पुनरावृत्ती घडू नये, यासाठी पोलिस सतर्क झाले आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढविली आहे.
गस्त वाढविली
आरपीएफ, जीआरपी, एमएसएफ, डॉग स्क्वॉडकडून संयुक्त गस्तीला सुरुवात झाली आहे. सायंकाळी सीएसएमटी स्थानकाच्या सुरक्षेची पाहणी करण्यात आली. मुंबईत पोलिस हाय अलर्टवर आहेत. तसेच सर्वच ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे.
१० हजार कॅमे-यांची नजर
मुंबईकर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे स्थानक आणि परिसरातील १० हजार सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून  देखरेख करण्यात येत आहे. मुंबईतील दैनंदिन प्रवासी आणि विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिस सज्ज आहेत. 
मुंबईत रोज ८० लाख 
लोकांचा लोकल प्रवास
मुंबईत मध्य व पश्चिम रेल्वेवरील १३९ रेल्वे स्टेशन असून, यावरून लोकलच्या ३२०० फे-या होतात. यातून ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करतात. यासह लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या शेकडो फे-या होतात.