महात्मा ज्योतिराव फुले यांचे वंशज गोऱ्हे, मूळचे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगुण या गावाचे. महात्मा फुले यांचे पणजोबा यांचे कटगुणांच्या कुलकर्णीबरोबर भांडण होऊन विकोपाला गेले म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पंजोबांनी कुटुंबासहित कटगुण गाव सोडण्याचा निर्णय घेतला व ते सर्व कुटुंबासहित पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड जवळ खानवडी या गावी आले. तेथं त्यांनी शेत जमीन घेऊन घर बांधले. ग्राम पंचायत मालमत्ता नोंदवही मध्ये आजही जमीन व घराची नोंद आहे. (पुरंदर तालुक्यात स्मारक समितीच्या वतीने 1995 मध्ये स्मारक बांधून उद्घाटन केले) ज्योतिरावांचे आजोबा शेटीबा गोऱ्हे खानवडी येथून पुण्याला आले. पुण्यात घर बांधले. शेटीबाना राणोजी, कृष्णा व गोविंद ही तीन मुले होती ते तिन्ही मुले पुण्याच्या पेशव्यांना फुले पूरवण्याचा व्यवसाय करत असत. त्यांच्या कामावर खुश होऊन पेशव्यांनी त्यांना 35 एकर जमीन इनाम दिली. गोऱ्हे कुटूंबाच्या फुलांच्या व्यवसायावरून लोक त्यांना फुले म्हणू लागले. म्हणून त्यांनी गोऱ्हे आडनाव बदलून फुले आडनाव लावले. तेव्हा पासून फुले आडनाव प्रचलित झाले.
सन 1818 सली पेशवाईचा अस्त झाला व पुण्यावर इंग्रज राजवट अंमलात आली. पेशवे कालीन समाज व्यवस्थेमध्ये जातिभेद व वर्णभेद रूढ होते. सामाजिक विषमता, अज्ञान चालीरीती, अंधश्रद्धा , सामाजिक गुलामगिरी, विधवा विवाह, बालविवाह बालहत्या, विधवांचे केश कापणे, स्पृश्य-
अस्पृश्य - शूद्र, अती शूद्र इत्यादी सामाजिक प्रथा रूढ होत्या. समाजात उच्चवर्गायाचे वर्चस्व होते. व त्यांचे सामाजिक गुलामगिरीत पिचलेल्या शूद्र- अतिशूद्रावर अत्याचार होत होते. अशा या कठीण काळात महात्मा फुले यांचे वडील गोविंदराव फुले आपल्या दुकानात भाजी व फुले विक्रीचा व्यवसाय करीत होते. याच सुमारास गोविंदराव फुले यांचा विवाह झगडे पाटलांच्या मुलीसोबत झाला मुलीचे नाव चिमणाबाई होते. त्यांना दोन मुले झाली पहिला राजाराम व दुसरा क्रांतीसुर्य ज्योतिराव. ज्योतिरावांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी गंज पेठ पुणे येथे झाला. हाच वाडा फुले यांच्या क्रांतीकार्याचा साक्षीदार आहे.
ज्योतिरावांचे प्राथमिक शिक्षण पंतोजीच्या शाळेत 1834 मध्ये सुरू झाले परंतु ज्योतिरावांच्या चाणाक्ष बुद्धिमत्तेमुळे त्यांच्या वडिलांना काही दृष्ट लोकांनी सांगून त्यांचे शिक्षण बंद केले. गोविंदरावांनी मग त्यांना घराच्या कामाला जुंपले पण हुशार व कुशाग्र बुद्धीच्या ज्योतिरावने वाचन आणि लेखन चालूच ठेवले. त्यांच्या घराशेजारी मुन्शी बेग व लिजीट इंग्रज साहेब राहत होते. त्यांना ज्योतिरावंच असामान्य बुद्धिमत्तेची जाणीव झाली व त्यांनी दोघांनी गोविंदरावांना सांगून तब्बल तीन वर्षांनी म्हणजे 1841 साली इंग्रजी मिशनच्या शाळेत ज्योतिरावांना पाठविण्यास गोविंदरावांना भाग पाडले. पददलित समाजावर होणारे अन्याय व अत्याचार पाहून ज्योतिरावांचे मन अतिशय दुःखी होते असे याच काळात ज्योतिरावांना थॉमस नावाच्या बंडखोर इंग्रज लेखकाचा एक ग्रंथ वाचण्यात आला. या ग्रंथाच्या वाचनामुळे ज्योतीरावांना आपण देशासाठी व देशातील पददलित समाजासाठी काही तरी करावयास पाहिजे असे वाटू लागले. ज्योतिरावंनी 1841 ते 1847 या काळात इंग्रजी शाळेतील माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
याच काळात त्यांचे एक उच्चवर्णीय मित्रांच्या लग्नाला ज्योतीराव निमंत्रणावरून गेले असताना त्यांना त्या लग्नाच्या वराती मधून तू शूद्र आहेस म्हणून अपमानित करून हाकलून दिले आणि त्याच ठिकाणी त्या अपमानातून क्रांतीसुर्याचा उदय झाला. आता आपण दलित पददलित समाजासाठी काहीतरी करायचेच अशी खून गाठ ज्योतिरावनी मनाशी बांधली आणि त्या परिस्थितीचा अभ्यास त्यांनी सुरू केला. त्याच वेळेस वयाच्या 12 व्या वर्षी इ.स. 1840 मध्ये त्यांचा विवाह सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील खंडूजी नेवसे पाटील यांची मुलगी सावित्री हिच्या बरोबर झाला. लग्ना वेळेस सावित्रीबाई चे वय 9 वर्षे होते. सावित्रीबाई यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. सावित्रीबाईंनी आपल्या पतीच्या ज्योतीरावांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यास मोलाची मदत केली. ज्योतिराव बरोबर हाल आपेष्टा व कष्ट सहन करून स्त्री शिक्षणाचा पाया सावित्रीबाईंनी घातला या देशातील चालीरीती अंधश्रद्धा अज्ञान सामाजिक गुलामगिरी उच्चवर्णीयांचे खालच्या वर्गावर होणारे अत्याचार बालविवाह, बालहत्या, विधवांचे केसकर्तन, इत्यादी अनिष्ट चालीरीतीमुळे कर्मकांडाच्या दलदली मध्ये पिचलेल्या खालच्या वर्गाला त्यांनी जाणीव करून दिली तसेच सामाजिक क्रांती करून पददलित समाजाला आपल्या हक्काची जाणीव करून दिली. राजकीय गुलामगिरी पेक्षा सामाजिक गुलामगिरी अत्यंत घातक आहे याची जाणीव जेव्हा महात्मा फुले यांना झाली तेव्हा त्यांनी या मागचे कारण शोधले आणि त्यांच्या लक्षात आले की हे सर्व अज्ञानामुळे, शिक्षण नसल्यामुळे होते. सामाजिक क्रांती घडवून आणण्यासाठी शाळा काढून पददलित व महिलांना शिक्षण देणे गरजेचे आहे हे लक्षात येताच महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात आपल्या घरापासून केली पत्नी सावित्रीबाई व मावस बहीण सगुणाबाई यांना लिहिण्यास व वाचण्यास शिकवले व 1847 साली नॉर्मल स्कूल मधून अध्यापन शिक्षणक्रम पूर्ण केले. ज्योतिरावांना सर्व लोक आदाराने तात्या म्हणत. ज्योतिराव फुले यांनी घोडदौड, तलवार, दांडपट्टा, पैलवानी यांचे ही शिक्षण घेतले होते.
इकडे सावित्रीबाई यांनी अध्यापन अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर 1848 साली पुण्याच्या बुधवार पेठेत भिडे वाड्यात मुलीची पहिली शाळा सुरू केली. ही देशातील पहिली मुलीची शाळा होय या शाळेतील पहिल्या 6 विद्यार्थिनी मुलींमध्ये 4 ब्राह्मण 1 मराठा व 1 धनगर अशा 6 मुली होत्या. वर्ष अखेर सर्व जाती-धर्माच्या मुली शिक्षण घेऊ लागल्या. अशा रीतीने सावित्रीबाई देशातील पहिल्या भारतीय महिला शिक्षिका झाल्या त्यावेळेस पददलित जातीच्या लोकांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. स्त्रियांना चूल आणि मूल यांच्या पलीकडे कोणताच अधिकार नव्हता स्त्री शिक्षणाबद्दल अनेक भ्रामक कथा होत्या. स्त्रीने शिक्षण घेणे म्हणजे पाप समजले जाई. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्योतिराव व सावित्रीबाई यांनी अनेक संकटावर मात करून आपले शिक्षणाचे कार्य चालू ठेवले. 11 मे 1848 रोजी पुण्यात मुला मुलीची दुसरी शाळा सुरू केली. या शाळेच्या ज्योतिरावांची मावस बहीण मुख्याध्यापिका झाल्या फातिमा शेख या मुस्लिम समाजाच्या महिला सावित्रीबाई यांना मदत करत मुस्लिम समाजाच्या असूनही फातिमा शेख यांनी धर्मांध वृत्तीला तोंड देत अध्यापनाचे कार्य केले. त्यानंतर 1851 मध्ये चिपळूणकर वाडा व रास्ता पेठेत मुलींच्या शाळा सुरू केल्या या महान कार्याबद्दल मेजर कॅन्डी यांच्या हस्ते ज्योतिरावांचा व सावित्रीबाईचा जाहीर सत्कार झाला. स्त्री मुक्ती चळवळीचे जनक म्हणून पीडित स्त्रियांचे उद्धार करते म्हणून ज्योतीरावांना गौरवविले तर आदर्श शिक्षिका म्हणून सावित्रीबाई यांना गौरवविले ज्योतिरावांनी 1855 रोजी तृतीय रत्न हे नाटक लिहिले तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जून 1869 मध्ये पोवाडा लिहिला. ब्राह्मणाचे कसब, शेतकऱ्यांच्या आसूड, गुलामगिरी, इत्यादी ग्रंथ लिहिले. अशा महानसामाजिक क्रांतीच्या महापुरुषाचे 28 नोव्हेंबर 1890 रोजी दुःखद निधन झाले. तेव्हा मोहनदास करमचंद गांधी म्हणाले ज्योतिराव फुले सचमुच महात्मा थे ....महात्मा जोतीराव फूले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
लक्ष्मण ढवळे