मराठवाड्याचे आर्थिक चित्र बदलेल, मुख्यमंत्र्यांना विश्वास
नागपूर : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गानंतर आता शक्तीपीठ महामार्ग पूर्ण केला जाणार आहे. विदर्भातील वर्धा ते कोकणातील बांधापर्यंत एकूण ८०५ किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे. राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. यामुळे मराठवाड्यासह विदर्भ, कोकणातील अर्थकारण बदलण्यास मदत होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
समृद्धी महामार्गाच्या चौथ्या टप्प्याचे लोकार्पण गुरुवार, दि. ५ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडले, त्यावेळी फडणवीस बोलत होते. समृद्धी महामार्ग रेकॉर्डब्रेक वेळेत पूर्ण झाला आहे. आता शक्तीपीठाचे कामही वेगात पूर्ण करण्यात येईल, असे ते म्हणाले. आता शक्तिपीठ महामार्ग लवकरच पूर्ण केला जाणार आहे. त्यामुळे मराठवाड्याचे आर्थिक चित्र बदलेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
राज्यातील १२ जिल्ह्यांतून जाणारा हा महामार्ग तीन शक्तिपीठांसह अनेक मोठ्या धार्मिक ठिकाणांना जोडणारा असेल. शक्तीपीठ महामार्ग ६ पदरी असणार आहे. महामार्गावर २६ ठिकाणांवर इंटरचेंज असेल. ४८ मोठे पूल, ३० बोगदे, ८ रेल्वे क्रॉसिंग असतील. शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल ८६ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यामुळे मराठवाड्यातील आर्थिक चित्र बदलेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
शक्तीपीठ महामार्ग
१२ देवस्थानांना जोडणार
कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी आणि नांदेड जिल्ह्यातील माहूरची रेणुकादेवी या तीन शक्तिपीठांना जोडणारा हा शक्तीपीठ महामार्ग असणार आहे. परळी वैजनाथ, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ (नागेश्वर), माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपुरचे विठ्ठल-रखुमाई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, सोलापुरातील सिद्धरामेश्वर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा (लाड), नृसिंहवाडी, औदुंबर या १२ देवस्थानांना हा महामार्ग जोडणार आहे.