खास युवकांसाठी ...

yongistan
By - YNG ONLINE



भारत हा युवकांचा देश आहे. कारण जगाच्या तुलनेत सर्वाधिक युवक भारतात आहेत. खरे म्हणजे युवा शक्ती अफाट आहे. परंतु या शक्तीला योग्य दिशा आणि मार्ग सापडला, तर या शक्तीचा योग्य विनियोग होऊ शकतो आणि त्याचे सकारात्मक परिणाम तात्काळ दिसायला लागतात. तथापि, या सर्वशक्तिमान युवाशक्तीला दिशा देण्याऐवजी कोणत्या तरी तात्कालिक गोष्टीत अडकवून त्यांची शक्ती वाया घालविण्यात अनेकांना रस असतो.


 बरीच मंडळी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी या युवाशक्तीला भरकटवण्याचे काम करते. अनेकदा दिशाभूल केली जाते. अशावेळी सावध पावले टाकून विचारपूर्वक वाटचाल करणे आवश्यक असते. परंतु आंतरमनातील ऊर्जाशक्ती संथ बसू देत नाही. काही तरी करण्याची उर्मी मनात दाटून येते आणि यातूनच आपण कुठे तरी गुंतलो जातो. हीच प्रवृत्ती घातक ठरते. त्यामुळे योग्यवेळी योग्य भूमिका घेणे खूप गरजेचे असते. परंतु आजूबाजूला सर्वत्र स्वार्थाचा बाजार भरलेला आहे. या जंजाळातून आपल्याला सावधपणे वाट शोधणे आवश्यक आहे. 


आजच्या जमान्यात दिशा भरकटवणा-यांची संख्या खूप आहे. पण योग्य रस्ता दाखविणारे बोटावर मोजण्याइतके आहेत. अशा लोकांना हेरून त्यांच्या सानिध्यात राहिलो आणि सन्मार्ग शोधला, तर त्यांचा भविष्यकाळ निश्चितच उज्ज्वल असेल. त्यामुळे युवकांनी बदलत्या काळात सावध हाका ऐकून सक्षमपणे वाटचाल केली पाहिजे. अशा युवकांना सन्मार्ग दाखविण्यासाठी आणि एक चांगला मित्र, साथीदार, वाटाड्या, साथी आणि ज्ञानभांडाराचे दालन उघडून देणारा एक ज्ञानचक्षू नेहमीच तुमच्यासोबत राहणार आहे. खरे म्हणजे आपल्या आजूबाजूला खूप घटना घडतात. ज्ञानाचा अथांग सागर नेहमीच लाटांच्या उसळ्या घेत असतो. परंतु आपल्याच मस्तीत जगत असल्यामुळे आपल्याला त्याचा गंध दरवळताना दिसत नाही. त्याची जाणीव करून देताना खास तुमच्यासाठी यंगिस्तानच्या माध्यमातून ज्ञानाचे दालन उपलब्ध करून देत आहोत.


यात फार काही नाही, परंतु तुमच्या जीवनात पावलोपावली उपयोगी पडणारे, तुमच्या जीवनाला आकार देतानाच ज्ञानाचे भांडार वाढविणारे, युवा शक्तीला योग्य दिशा देणारे हे व्यासपीठ असणार आहे. यातून एक-एक युवक घडत, उभारत गेला, तरी या मोहिमेचे फार मोठे यश मी मानतो. मी एक पत्रकार म्हणून जे-जे वाचतो, जे-जे पाहतो, जो-जो माहितीचा खजिना संकलित करतो, तोच तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. त्याचा शक्तिशाली युवाशक्तीला निश्चितच फायदा होणार आहे. मात्र, त्यासाठी यंगिस्तानला तुमची कायमची साथ हवी आहे. याची मला खात्री असल्याने आपल्या भक्कम पाठबळाच्या जोरावर यंगिस्तानसारखे युवाशक्तीला वाहिलेले पोर्टल सुरू करण्याचे शिवधनुष्य पेलण्याचा निश्चय केला आहे. याला तुमची नक्कीच साथ मिळेल, या अपेक्षेसह याचा शुभारंभ करतोय.....

-वसिष्ठ घोडके (पत्रकार) लातूर