दोन आठवड्यांच्या जोरदार कामगिरीनंतर आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ चा चीनमधील हॉंगझाऊ येथील हॉंगझोऊ आॅलिम्पिक स्पोर्टस सेंटर स्टेडियम येथे रविवार, दि. ८ आॅक्टोबर रोजी समारोप झाला. हार्ट टू हार्ट असे या स्पर्धेचे ब्रिदवाक्य होते. या स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे आशियाई स्पर्धेच्या इतिहासात भारताने पदकांची शंभरी प्रथमच ओलांडली. या ऐतिहासिक कामगिरीचे देशभरातून कौतुक होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हॉंगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंचे कौतुक केले. १० आॅक्टोबर रोजी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर हॉंगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंची भेट घेतली. या स्पर्धेत भारताने चमकदार कामगिरी करीत १०७ पदके जिंकली. यामध्ये २८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४१ कांस्य पदकांचा समावेश आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुढील पर्व आता २०२६ मध्ये जपानमध्ये होणार आहे. या स्पर्धेतील आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे जिंकलेल्या एकूण पदकांपैकी अर्धे पदके महिलांनी जिंकली आहेत. यावेळी पंतप्रधानांनी पॅरिस आॅलिम्पिकसाठी सर्वोत्तम प्रयत्न करा, असे सांगितले.