विराटकडून सचिनच्या विश्वविक्रमाची बरोबरी

yongistan
By - YNG ONLINE


कोलकाता : वृत्तसंस्था
भारताची धडाकेबाज सुरुवात, विराट-श्रेयस अय्यरची विक्रमी भागीदारी, अखेरच्या क्षणी जडेजाची सुरेख साथ याच्या जोरावर भारतीय फलंदाजांनी ३२६ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर सिराज, शमीचा भेदक मारा, जडेजाचा पंच आणि कुलदीपच्या फिरकीने दक्षिण आफ्रिकेला अवघ्या ८३ धावांत गुंडाळले आणि २४३ धावांनी विराट विजय मिळवित विश्वचषकात सलग आठव्यांदा विजयश्री खेचून आणली. दरम्यान, कोहलीने आज विराट कामगिरी करीत क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या वनडेतील ४९ शतकांच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. त्याने शतक ठोकत वाढदिवसादिवशीच ईडन गार्डनवर इतिहास रचला.  
विश्वकप २०२३ मध्ये रविवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी भारत-दक्षिण आफ्रिकेत सामना रंगला. सुरुवातीला भारताने दिलेल्या ३२७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. भन्नाट फॉर्मात असलेला क्विंटन डिकॉक अवघ्या पाच धावांवर तंबूत परतला. मोहम्मद सिराजने त्याला त्रिफाळाचीत केले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी ढेपाळली. भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या. 
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर एकेकाळी क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जायचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर अनेक मोठे विक्रमही नोंदवले गेले आहेत. पण भारतीय संघाचा सध्याचा स्टार फलंदाज विराट कोहलीने त्याच्या वनडेतील ४९ शतकांच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. विराट कोहलीच्या शतकानंतर ईडन गार्डन स्टेडियममध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला.  सचिनने शतकांचे शतक केले, त्यावेळी विराट आणि रोहित माझा विक्रम मोडित काढू शकतो, असे ११ वर्षांपूर्वी सांगितले होते. त्याचा त्याचा तो अंदाज विराटने खरा ठरविला. 
२७७ डावांत ४९ शतके
विराट कोहलीने अवघ्या २७७ डावांत ४९ वे वनडे शतक ठोकले. सचिनला ४९ वनडे शतकांसाठी ४५२ डाव खेळावे लागले होते. विराटने कमी डावांत वेगवान धावा करून रनमशीन असल्याचे दाखवून दिले. 

१८ नंबरची जर्सी लकी
कोहलीने अंडर-१९ विश्वचषक जिंकला तेव्हा त्याने १८ क्रमांकाची जर्सी घातली होती. तसेच १८ डिसेंबर २००६ रोजी कोहलीच्या वडिलांचे निधन झाले. त्या दिवशी तो रणजी सामना खेळत होता. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळावे, असे त्याच्या वडिलांचे स्वप्न होते. त्यामुळे विराटने २००८ मध्ये भारतासाठी पदार्पण केले, तेव्हापासून तो वडिलांच्या प्रेमामुळे आणि त्यांच्या स्मरणार्थ १८ नंबरची जर्सी घालतो. हा नंबर त्याच्यासाठी लकी आहे. कोहलीच्या मते, हा आकडा त्याला वडिलांच्या जवळचा वाटतो.  

विक्रमांचा रतीब
-विराट कोहली हा वनडे क्रिकेटमध्ये भारतात ६ हजार धावा करणारा सचिननंतरचा भारतातील दुसरा खेळाडू ठरला.

-वर्ल्डकपमध्ये १५०० धावा पूर्ण करणारा सचिननंतरचा दुसरा खेळाडू ठरला.

-कोहलीने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ८ डावांत सहावेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. 

-वनडे इतिहासात सर्वाधिकवेळा ५० पेक्षा जास्त धावा करणा-यांच्या यादीत दुस-या स्थानावर पोहोचला.

-विराटने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आपल्या ५०० धावा पूर्ण केल्या. 
 
सचिनचा विक्रम
सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला. त्याने ४५२ वनडे सामन्यात ४४.८ च्या सरासरीने तब्बल १८ हजार ४२६ धावांचा पाऊस पाडला. यादरम्यान त्याने ४९ शतके ठोकली. याशिवाय ९६ अर्धशतकेही लगावली. यादरम्यान त्याने १९५ षटकार आणि २०१६ चौकारांचा पाऊस पाडला. सचिन तेंडुलकर वनडेमध्ये ४१ वेळा नाबाद राहिला. सचिन तेंडुलकरची वनडेमधील सर्वोच्च धावसंख्या नाबाद २०० धावा इतकी आहे.  
जडेजाचा पंच
भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने ९ षटकात ३३ धावांच्या मोबदल्यात ५ विकेट घेतल्या. जडेजाने कगिसो रबाडा, केशव महाराज, डेविड मिलर, हेनरिक क्लासेन आणि टेम्बा बवुमा यांना तंबूचा रस्ता दाखवला. 
जडेजाचा विक्रम
विराटच्या शतकानंतर रविंद्र जडेजाने गोलंदाजीत धमाका केला. त्याने ९ षटकांत ३३ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. त्याने जवळपास १२ वर्षानंतर भारताच्या फिरकीपटूने वर्ल्डकपमध्ये ५ विकेट्स घेण्याची किमया केली. यापूर्वी युवराज सिंगने वर्ल्डकप सामन्यात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. तो भारताकडून वर्ल्डकपमध्ये ५ विकेट्स घेणारा पहिला फिरकीपटू होता. आता त्याच्या जोडीला रविंद्र जडेजा देखील आला आहे.