विद्रोहाची पहिली ठिणगी पडल्यानंतर पॅलेस्टाईनमधील वातावरण ढवळून निघाले. गाझामधील जबलिया नावाच्या ठिकाणी एक निर्वासित छावणी होती. येथे पॅलेस्टिनी लोक राहत होते. हे इस्राईलच्या सीमेला लागून असलेले ठिकाण होते. ९ डिसेंबर १९८७ रोजी इस्राईली सैनिकांना घेऊन जाणा-या ट्रकने कारला धडक दिली. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी तीन निर्वासित आणि तीन जबलिया कॅम्पमधील होते. इस्राईली सैनिकांनी जाणूनबुजून हल्ला केल्याचा आरोप पॅलेस्टाईनने केला. या हल्ल्याच्या निषेधार्थ पॅलेस्टाईनमध्ये निदर्शने सुरू झाली. ही इस्राईलविरोधात पहिली ठिणगी पडली. येथून पुढे इस्राईल-पॅलेस्टिनी यांच्यात अंतर पडत गेले. आजचा संघर्ष त्याचेच मूळ आहे.
सुरुवातीला पॅलेस्टिनींनी मोठ्या प्रमाणात काठ्या आणि दगडांनी इस्रायली सैनिकांवर हल्ले केले. त्यावेळी पॅलेस्टाईनकडे काठ्या, दगड हेच शस्त्र होते. इतिहासाच्या पुस्तकांत हा पहिला विरोध अर्थात विद्रोह म्हणून ओळखला जातो. शेख अहमद यासीनच्या माध्यमातून गाझा पट्टीवर कब्जा करणा-या इस्राईलला तिथे विरोध सुरू झाला. उर्वरित वेस्ट बँकमध्ये पीएलओ होती, जी इस्राईलविरुद्ध युद्ध करत होती. त्यामुळे या भागातही असंतोष वाढला होता. यातून विरोध वाढत गेला. त्यामुळे इस्राईलला गाझा पट्टी आणि वेस्ट बँक या दोन्ही ठिकाणी लढावे लागले. पण हा सशस्त्र लढा नव्हता. त्यामुळे इस्राईलला उघडपणे शस्त्रे वापरता आली नाहीत. अशा स्थितीत इस्राईलने पुन्हा शेख अहमद यासीनची मदत घेतली.
इस्राईलने शेख अहमद यासीनच्या मुजम्म-अल-इस्लामिया या संघटनेला आधीच मान्यता दिली होती. या माध्यमातून त्यांनी विद्रोह संपवण्याचा प्रयत्न केला. यातून शेख अहमद यासीन अतिरेकी संघटना तयार करेल, ती संघटना इस्राईलवर हल्ला करेल आणि बदल्यात इस्राईल गाझामध्ये नव्हे तर वेस्ट बँकवर हल्ला करेल आणि पीएलओला पूर्णपणे नष्ट करेल. तसे झाल्यास या माध्यमातून पॅलेस्टाईन ताब्यात घेता येईल, अशी इस्राईलची व्यापक योजना होती.
शेख अहमद यासीनला इस्राईलचे म्हणणे टाळता आले नाही. त्याने मुजम्मा-अल-इस्लामिया ही दहशतवादी संघटना स्थापन केली. या संघटनेला हरकत अल-मुकावामा अल-इस्लामिया (हमास) असे नाव दिले. अर्थात ही संघटना हमास नावाने ओळखली जाऊ लागली. शेख अहमद यासीन याने स्वत:ला या संघटनेचा धार्मिक नेता बनवले आणि लढ्याची कमान अब्देल अझीझ अली अब्दुल मजीद अल रंतीसीकडे सोपविली, त्यांना पॅलेस्टाईनचा सिंह म्हणून ओळखले जाते.
इस्राईलच्या म्हणण्यानुसार हमासने पहिला हल्ला १६ फेब्रुवारी १९८९ आणि दुसरा हल्ला ३ मे १९८९ रोजी केला. या दोन्ही हल्ल्यांत हमासने सैनिकांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या केली. इस्राईललाही हेच हवे होते. पश्चिम किना-यातील पीएलओचा नायनाट करण्याच्या उद्देशाने त्यांनी हवाई हल्ले सुरू केले. पीएलओचे लोकही गाझा पट्टीत होते. त्यांना संपविण्यासाठी इस्राईलने हमासची मदत घेतली. यामुळे पीएलओ कमकुवत झाला. गाझात मजबूत असलेल्या हमासने वेस्ट बँकमध्येही आपली ताकद वाढवली. मग त्यांनी पुढे ना मोसादचे ऐकले, ना इस्राईलचे आणि आज इस्राईलचा शत्रू पीएलओ किंवा पॅलेस्टाईन किंवा वेस्ट बँक नाही, तर तोच हमास आहे. या हमासचा जन्म इस्राईलच्या मदतीनेच झाला आणि आता हमासच त्यांचा काळ बनू पाहात आहे. त्यांच्यात आज टोकाचा संघर्ष सुरू आहे.
इस्राईलने हमाससोबत केलेल्या करारात अवनर कोहेनचाही सहभाग होता. कोहेन यांचा जन्म ट्युनिशियात झाला होता. १९७० आणि १९८० च्या दशकात ते एक इस्राईली अधिकारी होते, ते गाझा पट्टीत तैनात होते. २००९ मध्ये दिलेल्या मुलाखतीत हमास ही इस्राईलने निर्माण केलेली संघटना आहे. गाझा पट्टीत तैनात असताना मी माझ्या अधिका-यांना फूट पाडा आणि राज्य करा, हे धोरण थांबवण्यास सांगितले होते. त्यावेळी अधिका-यांनी ऐकले नाही. त्यातून हमासचे बळ वाढत गेले आणि तेच हमास आज इस्राईलच्या विरोधात आक्रमकपणे मैदानात उतरले आहे, असे कोहेन म्हणाले. तसेच पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनचे प्रमुख आणि फतह पार्टीचे संस्थापक यासर अराफत यांनीदेखील हमासचा निर्माता पॅलेस्टाईन नसून इस्राईलचे पाठबळ असल्याचे सांगत. इस्राईलच्या बळावरच हमास वाढली आणि पुढे त्यांनी इस्राईलशी नाते तोडले. त्याचवेळी शेजारी देशांचे त्यांना बळ मिळत गेले. त्यामुळे आता हमास इस्राईलशी तेवढ्याच ताकदीने टक्कर देत आहे. यातून युद्धाला भविष्यात वेगळे वळण लागण्याची चिन्हे आहेत.