अलिकडे इस्रोची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. भारतीय वैज्ञानिकांनी उत्कृष्ट कामगिरी करीत प्रमुख देशांच्या पंक्तीत नेऊन बसविण्याचे काम केले आहे. अलिकडे ‘चांद्रयान ३’ आणि ‘आदित्य’ या मोहिमांमध्ये यश मिळविल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) गगनयान मोहिमेवर लक्ष केंद्रित केले. या मोहिमेद्वारे २०२५ मध्ये मानव अवकाशात पाठवण्याचे उद्दिष्ट आहे. यासोबतच भारताचे स्वतंत्र अवकाशस्थानक २०३५ पर्यंत तर २०४० मध्ये भारतीयाला चंद्रावर घेऊन जाण्याचा निश्चय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. यासाठी १० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला.
गगनयान मोहिमेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये लाल किल्ल्यावरून केली होती. ही मोहीम २०२२ मध्ये प्रत्यक्षात आणण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, कोरोनाच्या जागतिक साथीमुळे आणि तांत्रिक क्लिष्टतेमुळे मोहीम पुढे ढकलावी लागली. आता २०२५ मध्ये ती प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. मानवाला अंतराळात घेऊन जाण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याबाबतचा अभ्यास इस्रोने ‘ऑर्बिटल व्हेईकल’ या नावाने २००६ मध्येच सुरू केला होता. दोन जणांना सात दिवस अवकाशात नेऊन पुन्हा पृथ्वीवर आणणे (कुपी समुद्रात पाडणे) याचा प्रामुख्याने हा अभ्यास होता. प्रकल्प म्हणून २००७ मध्ये याची औपचारिक सुरुवात करण्यात आली आणि २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.
भारताचे पहिले अंतराळवीर होण्याचा मान राकेश शर्मा यांना जातो. रशियाच्या ‘सोयूझ टी-११’ यानाद्वारे ते अंतराळात गेले होते. रशियाच्या ‘सॅल्यूट-७’ अवकाशस्थानकात ते ७ दिवस २१ तास आणि ४० मिनिटे होते. एकूण ४३ विविध प्रयोगांत त्यांनी भाग घेतला. आता तब्बल ४० वर्षांनी भारत गगनयान मोहिमेद्वारे स्वबळावर व स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे मानव अंतराळात पाठवणार आहे. रशिया, अमेरिका आणि चीन या तीन देशांनीच आतापर्यंत ही किमया साधली आहे. भारताची ही मोहीम यशस्वी झाल्यास स्वत:च्या प्रक्षेपक व यानाद्वारे मानवाला अंतराळात पाठवणारा भारत चौथा देश ठरेल.
गगनयानाचे प्रमुख दोन भाग आहेत. क्रू एस्केप सिस्टिम (सीईएस) आणि क्रू मॉड्यूल व सर्व्हिस मॉड्यूल यांचे एकत्रितपणे ऑर्बिटर मोड्यूल. यातील क्रू मोड्यूलची म्हणजेच गगनयान मोहिमेत मानवाला घेऊन जाणा-या कुपीची पहिली यशस्वी चाचणी (टीव्ही-डी १) (२१ ऑक्टोबर २०२३ रोजी) घेतली. अंतराळ प्रवासात काही अडचण आली, तर मोहीम अर्ध्यावर सोडून सुरक्षितपणे पृथ्वीवर परतता येईल का, हे या चाचणीतून पाहण्यात आले. या मानवरहित चाचणीत १७ किलोमीटर उंचीवर यान गेल्यानंतर तांत्रिक अडचण निर्माण करण्यात आली व कुपीच्या अग्निबाणापासूनच्या सुरक्षित विलगीकरणाची चाचणी घेण्यात आली.
अशा प्रकारच्या आणखी किमान दोन चाचण्या अधिक उंचीवर घेण्यात येणार आहेत. त्यानंतर यंत्रमानवाची चाचणी होईल व प्रत्यक्षात २०२५ मध्ये तीन भारतीय अवकाशात जातील. मानवी अंतराळ उड्डाण मोहीम होण्याआधी तंत्रज्ञानाची चाचणी घेतली जाते, प्रात्यक्षिके घेतली जातात. या प्रात्यक्षिक मोहिमांत इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट, पॅड अबॉर्ट टेस्ट आणि टेस्ट व्हेईकल यांचा समावेश आहे.
‘इंटिग्रेटेड एअर ड्रॉप’ची तयारी
‘इस्रो’ आता गगनयान मोहिमेअंतर्गत ‘इंटिग्रेटेड एअर ड्रॉप’ चाचणीची तयारी करत आहे. यानुसार गगनयानातील कुपीला हेलिकॉप्टरच्या साह्याने विविध उंचीवर नेण्यात येणार आहे व तिथून खाली सोडून देण्यात येणार आहे. यामुळे कुपीवर काय परिणाम होतो, हे नोंदवलं जाणार आहे.
व्योममित्र
गगनयानाच्या मानवरहित चाचण्या झाल्यानंतर पुढील वर्षी रोबोच्या चाचण्याही घेतल्या जातील. यासाठी तयार करण्यात येत असलेल्या मानवीय चेहरा असलेल्या रोबोचं ‘व्योममित्र’ असे नामकरण करण्यात आले. मानवाला अंतराळात पाठवण्यापूर्वी व्योममित्र अवकाशात पाठवण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हा रोबो तयार करण्यात येत आहे. यानाच्या उड्डाणाच्या वेळी जाणवणारी कंपनं किंवा झटके यांच्या नोंदी करण्याची क्षमता व्योममित्रमध्ये असेल.