जागतिक स्तरावर प्रत्येक दिवसाला एक वेगळे महत्त्व आहे. जगात जसा जागतिक महिला दिन साजरा केला जातो, तसा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन देखील साजरा केला जातो. महिलांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने जसा महिला दिन साजरा केला जातो. तसाच पुरुष दिन साजरा करण्यामागेदेखील हाच उद्देश आहे. म्हणूनच १९ नोव्हेंबर रोजी संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. पुरुषांशी निगडित वेगवेगळे विषय आणि समस्यांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
खरे म्हणजे पुरुषाचे कर्तृत्व फार मोठे आहे. परंतु अनेकदा पुरुषाला धावपळीच्या जगात स्वत:कडे लक्ष द्यायलादेखील वेळ नाही. त्यामुळे जगात जसा महिला दिन साजरा केला जातो, तसा पुरुष दिन साजरा होतो का, याची अनेकांना साधी कल्पनादेखील नाही. परंतु पुरुषाच्या कर्तृत्वाचादेखील सन्मान करण्याची संधी जागतिक स्तरावर दिली गेली आहे. त्यामुळेच १९ नोव्हेंबर हा दिवस जागतिक पुरुष दिन म्हणून साजरा केला जातो. पुरुषांचा संघर्ष आणि ते वर्षानुवर्षे सामोरे जात असलेल्या सामाजिक परिस्थितीची माहिती समाजाला व्हावी, या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. पुरुषांच्या आरोग्याप्रति, लिंग संबंधाविषयी जागरुकता, लैंगिक समानतेचा विकास करण्यासाठी हा दिवस जागतिक स्तरावर सेलिब्रेट केला जातो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी समाज आणि कुटुंबातील पुरुषांचे महत्त्व आणि योगदान अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. समाजात पुरुषांच्या कल्याणासाठी आणि आरोग्याबाबत जागरुकता निर्माण केली जाते, तो हाच दिवस आहे. समाज, समुदाय, कुटुंब, विवाह, मुलांची काळजी आणि समाजातील पुरुषांचे योगदान याचे महत्त्व अधोरेखीत करणारा हा दिवस आहे. या दिवशी समाजात पुरुषांविरुद्ध होत असलेल्या भेदभावावरही प्रकाश टाकला जातो. पुरुष दिनामुळे लैंगिक समानतेला प्रोत्साहन मिळण्यास मदत होते.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा इतिहास
१९९९ मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील वेस्ट इंडीज विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. जेरोम तेलकसिंग यांनी त्यांच्या वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन पहिल्यांदा साजरा केला. या दिवशी त्यांनी पुरुषांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रोत्साहन दिले. १९ नोव्हेंबर २००७ रोजी भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्यात आला. पुरुषांचीही समाजात आणि कुटुंबात वेगळी ओळख असते. त्यांच्या योगदानाचे कौतुक करणे महत्त्वाचे आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे.