खा. बृजभूषण सिंहला सरकारने पाठीशी घातल्याने नाराज
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी लैंगिक छळाचा आरोप असलेल्या भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांच्या निवडीनंतर दि. २१ डिसेंबर २०२३ रोजी साक्षी मलिक आणि विनेश फोगट या कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. यानंतर दुस-याच दिवशी म्हणजेच २२ डिसेंबर रोजी बजरंग पुनियाने पद्मश्री वापसीची घोषणा केली. बजरंग पुनियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून पद्मश्री परत करणार असल्याचे म्हटले.
पैलवानांच्या प्रदीर्घ आंदोलनानंतर बृजभूषण सिंह यांना अध्यक्षपद सोडावे लागले. मात्र, ज्या नवीन अध्यक्षांची निवड झाली, ते बृजभूषणचे राईट हँड आहेत. त्यामुळे गेल्या ११ महिन्यांपासून सुरू असलेले कुस्तीगीरांचे आंदोलन पूर्णपणे निष्प्रभ ठरले. यामुळेच बजरंग पुनियाने आपले पदक परत करण्याची घोषणा केली. पुनियाने पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात या वर्षी जानेवारीत देशातील महिला कुस्तीपटूंनी कुस्ती संघटनेचे प्रभारी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले. त्या आंदोलनात मीही सामील झालो. त्यावेळी सरकारने ठोस कारवाईचे आश्वासन दिले. तेव्हा पहेलवान जानेवारीत घरी परतले. पण तीन महिने उलटूनही एफआयआर दाखल झाला नाही. तेव्हा एप्रिलमध्ये कुस्तीपटू पुन्हा रस्त्यावर उतरले आणि एफआयआर नोंदविण्याची मागणी केली. परंतु त्याचीही दखल घेतली नाही. शेवटी दिल्ली पोलिसांनी किमान एफआयआर नोंदवावा म्हणून आंदोलन केले, पण तरीही काही काम झाले नाही. अखेर कोर्टाच्या आदेशाने एफआयआर नोंदवावा लागला.
जानेवारीत तक्रारदार महिला कुस्तीपटूंची संख्या १९ होती, जी एप्रिलपर्यंत ७ वर आली. म्हणजे तब्बल १२ लोकांनी माघार घेतली. आंदोलन ४० दिवस चालले. या आंदोलनातून आणखी एक महिला कुस्तीगीर बाहेर पडली. त्यावेळी आंदोलन मोडित काढण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी आम्ही आमची पदके गंगेत टाकण्याचा विचार केला. मात्र प्रशिक्षक आणि शेतक-यांनी त्याला विरोध केला. त्यावेळी एका मंत्र्याचा फोन आला. त्यांनी परत येण्याची विनंती केली. नंतर गृहमंत्र्यांचीही भेट घेतली. त्यावेळी महिला कुस्तीपटूंना न्याय देण्याची भूमिका घेतली. पण प्रत्यक्षात आता राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत बृजभूषण सिंह यांच्या निकटवर्तीय संजय सिंह यांच्या पॅनलचा विजय झाला. त्यामुळे बृजभूषण यांच्या विरोधात जो लढा दिला, तो निष्फळ ठरला. त्यामुळे ऑलिम्पिक पदक जिंकणारी एकमेव महिला कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगटने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. मलिकने आता मी कुस्तीच्या मैदानात कधीच दिसणार नाही, असे सांगितले. यावेळी तिला अश्रू अनावर झाले. त्यामुळे मीदेखील आता पद्मश्री पदक परत करण्याचा निर्णय घेतला आहे, असे बजरंग पुनियाने सांगितले.
पुनियाला २०१९ मध्ये
मिळाला होता पद्मश्री
बजरंग पूनियाला २०१९ साली पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. हा भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बजरंगला हा पुरस्कार दिला होता. त्याच वर्षी बजरंगला खेलरत्न हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कारदेखील मिळाला होता. २९ वर्षीय बजरंग हा भारताच्या यशस्वी कुस्तीपटूंपैकी एक आहे. त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ४, आशियाई स्पर्धेत २, राष्ट्रकुल स्पर्धेत ३ आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये ८ पदके जिंकली आहेत.