मिनी लोकसभा निवडणुकीत मोदींचा करिश्मा

yongistan
By - YNG ONLINE

२०२३ च्या अखेरच्या टप्प्यात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम अशा पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. पाचपैकी चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबर २०२३ रोजी जाहीर झाला. यात मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारला. या तिन्ही राज्यांत कॉंग्रेसला धक्का बसला. परंतु तेलंगणात केसीआर यांच्या बीआरएसला धूळ चारून काँग्रेसने १० वर्षांची सत्ता उलथवून टाकत सत्ता हस्तगत केली. राजस्थानात ११५, मध्य प्रदेशात १६४ तर छत्तीसगडमध्ये ५४ जागा जिंकत भाजपने या तिन्ही राज्यांत स्पष्ट बहुमत मिळवले. 
मतदानानंतर कॉंग्रेस-भाजपमध्ये चुरस असल्याचे एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आले. तसेच छत्तीसगडमध्ये पुन्हा कॉंग्रेसच येईल, असाही अंदाज वर्तवला होता. मात्र, एक्झिट पोलचा अंदाज खोटा ठरवत भाजपने या तिन्ही राज्यांत मोठे यश मिळविले. मध्य प्रदेशात मागील १८ वर्षांपासून शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता राहिलेली आहे तरीही भाजपने २३० पैकी १६४ जागा मिळवित एकहाती विजय मिळविला. येथे कॉंग्रेसला ६४ आणि इतर १ असे बलाबल झाले. राजस्थानातही १९९ पैकी भाजपने ११५ जागांवर विजय मिळविला. यात कॉंग्रेसला ६९ तर बसपा २ आणि इतरांना ११ जागा मिळविल्या. छत्तीसगडमध्येही भाजपने ५४ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. येथे कॉंग्रेसला ३६ जागांवर समाधान मानावे लागले. यातून पुन्हा एकदा मोदींचा करिश्मा पाहायला मिळाला. विशेष म्हणजे या तिन्ही राज्यांत भाजपने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. 
दरम्यान, तेलंगणातही राज्य निर्मितीपासून म्हणजे मागच्या १० वर्षांपासून केसीआर यांच्या बीआरएसची सत्ता होती. ही सत्ता उलथवून टाकण्यात कॉंग्रेसला यश मिळाले. कॉंग्रेसने येथे ११९ पैकी ६४ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता काबिज केली. येथे कॉंग्रेसचे रेवंत रेड्डी यांनी आपला करिश्मा दाखविला. भाजपलाही येथे ८ जागा मिळाल्या. तेलंगणात विद्यमान खासदार रेवंत रेड्डी हे गेमचेंजर ठरले. रेवंत रेड्डी हे तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. आक्रमक कार्यशैली आणि संघटनेत दबदबा असे रेवंत रेड्डी यांचे नेतृत्व आहे.  

मिझोरममध्ये सत्तापालट
झेडपीएमला एकहाती सत्ता
ऐझॉल : मिझोरम विधानसभा निवडणुकीचा  निकाल ४ डिसेंबर २०२३ रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत राज्यात सत्तापालट झाला असून झोरम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) पक्षाने राज्यात सत्ता मिळविली. लालदुहोमा यांच्या नेतृत्त्वाखाली झेडपीएम पक्षाने २७ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. सत्ताधारी एमएनएफ पक्षाला केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले. सर्व ४० जागा लढवलेल्या काँग्रेसला तर अवघ्या एका ठिकाणी यश मिळाले तर दोन जागा इतरांच्या पदरात पडल्या.२०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत झेडपीएम पक्षाला निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे पक्षाचे प्रमुख असणारे लालदुहोमा यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, ५ वर्षांत मोठे यश मिळविले. पक्षाचे प्रमुख लालदुहोमा हे इंदिरा गांधींच्या काळापासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे पक्ष नवा असला तरी ते नवखे नाहीत.