नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या ५ वर्षात देशातून एक लाखाहून अधिक कंपन्या कमी झाल्या आहेत. यातील बहुतांश कंपन्यांनी कंपनी कायद्यानुसार आत्मसमर्पण केले आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार या काळात अनेक कंपन्यांनी दिवाळखोरीची प्रक्रियाही सुरू केली. केंद्रीय मंत्री राव इंद्रजितसिंह यांनी दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी लोकसभेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, २०१८-१९ ते २०२३-२४ या आर्थिक वर्षात १,०६,५६१ कंपन्या कोणत्या ना कोणत्या कारणाने बंद झाल्या आहेत. व्यवसाय बंद करण्यासाठी त्यांनी कंपनी कायदा २०२३ चा वापर केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात कंपन्या बंद झाल्या असतील, तर रोजगार तर त्याच्या अनेक पटींनी बुडाले आहेत, असे म्हणावे लागेल.
११६८ कंपन्या दिवाळखोरीत
केंद्रीय मंत्री राव इंद्रजितसिंह म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत ११६८ कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत. त्यापैकी ६३३ दिवाळखोर घोषित करण्यात आले असून उर्वरित प्रकरणांमध्ये प्रक्रिया सुरू आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये कंपन्या बंद होण्यासाठी ६ ते ८ महिने लागले तर काही प्रकरणांमध्ये ही वेळ १२ ते १८ महिन्यांपर्यंत पोहोचली. राव इंद्रजितसिंह यांच्या म्हणण्यानुसार कंपनीची निर्मिती आणि विघटन प्रक्रियेला गती देण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. आम्ही ही प्रक्रिया सुलभ करू, असेही त्यांनी सांगितले.
५ वर्षात ७९४६ विदेशी कंपन्या भारतात
दुसरीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका उत्तरात सांगितले की, गेल्या ५ वर्षांत ७९४६ विदेशी कंपन्यांनी भारतात त्यांच्या उपकंपन्या स्थापन केल्या आहेत. त्यामुळे भारतात व्यवसायाच्या संधी वाढल्या असून परदेशी गुंतवणूकदार देशात गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे स्पष्ट होते.