भोपाळ : वृत्तसंस्था
मध्य प्रदेशातील मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स सोमवार, दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी संपला. ओबीसी नेते आमदार मोहन यादव हे मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत तर राज्याला दोन उपमुख्यमंत्री देण्यात आले आहेत. जगदीश देवडा आणि राजेश शुक्ला यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. तसेच माजी केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना विधानसभा अध्यक्ष करण्यात आले आहे. छत्तीसगडमध्येही असाच धक्कातंत्राचा वापर करून विष्णुदेव साय यांच्यावर राज्याची धुरा सोपविली.
५८ वर्षीय मोहन यादव यांच्या हाती मध्य प्रदेशची सूत्रे देण्यात आली आहेत. पक्षाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. नरेंद्रसिंह तोमर यांनी आमदार झाल्यानंतर केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांना विधानसभा स्पीकरची जबाबदारी देण्यात आली.
अर्थमंत्री आणि मंदासोर मतदारसंघाचे दोन वेळचे आमदार जगदीश देवडा आणि जनसंपर्क मंत्री राजेंद्र शुक्ला या दोघांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाल्यानंतर मोहन यादव म्हणाले की, मी एक छोटा कार्यकर्ता आहे. राज्य आणि केंद्रातील नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाबाबत धन्यवाद, असे म्हटले. मोहन यादव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्वासातले मानले जातात. शिवराजसिंह चौहान सरकारमध्ये ते शिक्षणमंत्री होते. भाजप पक्षाच्या भोपाळमधील बैठकीत चौहान यांनीच त्यांच्या नावाची शिफारस केल्याचे समजते. भाजपने मोहन यादव यांची नियुक्ती करून धक्कातंत्राचा वापर केला असल्याचे बोलले जाते.