जयपूर : वृत्तसंस्था
छत्तीसगड आणि मध्य प्रदेशप्रमाणेच राजस्थानातही भाजपने धक्कातंत्राचा वापर करीत पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचलेल्या भजनलाल शर्मा या नवख्या चेह-याला मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. हा माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना धक्का मानला जात आहे. यासोबतच मध्य प्रदेशाप्रमाणेच येथेही दोन उपमुख्यमंत्री दिले आहेत. यात दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा हे उपमुख्यमंत्री असणार आहेत. यासोबतच विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी वासुदेव देवनानी यांच्या नावाची घोषणा झाली. १५ डिसेंबर रोजी त्यांचा शपथविधी झाला.
भाजपच्या विधिमंडळ गटाची मंगळवार, दि. १२ डिसेंबर २०२३ रोजी बैठक पार पडली. यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदासाठीची नावे जाहीर करण्यात आली. दिया कुमारी या जयपूरचे शेवटचे शासक महाराजा मानसिंग द्वितीय यांच्या नात आहेत. २०१९ मध्ये दिया कुमारी खासदार होत्या. नंतर पक्षाचा निर्णय मान्य करून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. राजकुमारी दिया कुमारी या विद्याधरनगर या मतदारसंघातून ७१ हजार ३६८ मतांनी विजयी झाल्या. प्रेमचंद बैरवा हे दुडू येथून निवडून आले आहेत. निवडणुकीत त्यांनी बाबूलाल नगर यांचा पराभव केला. त्यांनी १९९५ मध्ये ब्लॉक संघटनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. वासुदेव देवनानी हे अजमेर उत्तरमधून निवडून आले आहेत.
राज्यात माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर होत्या. तसेच त्यांनी लॉबिंग केल्याचेही सूत्रांचे म्हणणे होते. एवढेच नव्हे, तर किमान १ वर्ष मुख्यमंत्री करण्यात यावे, अशी मागणी वसुंधराराजे यांनी केली होती. मात्र, त्यांच्या मागण्या डावलून राज्यात नव्या चेह-याला संधी देण्यात आली. भजनलाल शर्मा यांनी प्रदेश सरचिटणीस या पदावर पक्षसंघटनेत काम केले आहे. आमदार म्हणून ते पहिल्यांदाच निवडून आले. तत्कालीन आमदार अशोक लाहोटी यांचे तिकीट कापून भजनलाल यांना संधी देण्यात आली. भजनलाल शर्मा यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी आहे.