स्वातंत्र्य चळवळीत गाजलेल्या काकोरी कटातील क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने १९२७ मध्ये आजच्याच दिवशी फाशी दिली होती. आजच्या दिवशी स्वतंत्र भारताने पोर्तुगीजांच्या राजवटीतून गोवा मुक्त करत स्वतंत्र केला तर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचाही आजच वाढदिवस आहे.
१९२७ : काकोरी कटातील ३ क्रांतिकारांना फाशी : स्वातंत्र्य चळवळीत गाजलेल्या काकोरी कटातील क्रांतिकारी राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान यांना आजच्या दिवशी फाशीची शिक्षा देण्यात आली. काकोरी जवळ हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन या सशस्त्र क्रांतिकारांच्या संघटनेने सरकारी खजिना लुटला. ही लूट म्हणजे ब्रिटीश सत्तेला आव्हान होते. यात काकोरी कटात महत्त्वाची भूमिका बजावणा-या तिघांना फाशीची शिक्षा देण्यात आली तर चंद्रशेखर आझाद हे ब्रिटिशांच्या हाती लागले नाहीत. ब्रिटिशांनी केलेल्या कारवाईमुळे हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन ही संघटना कमकुवत झाली.
१९६१ : गोवा मुक्ती दिन
गोवा, दमण आणि दीव तसेच दादरा आणि नगर हवेली या भागावर जवळपास ४५० वर्षे सत्ता असणा-या पोर्तुगीज राजवटीची आजच्या दिवशी अखेर झाली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण त्यानंतरही महाराष्ट्र शेजारच्या गोव्यातील जनतेला मात्र स्वातंत्र्याची पहाट पाहण्यासाठी १४ वर्ष वाट पाहावी लागली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यानंतर गोवा स्वातंत्र्य लढ्याची धार तीव्र झाली. सशस्त्र आणि अहिंसक, सत्याग्रह या मार्गाने गोव्याचा स्वातंत्र्य लढा सुरू होता. अखेर १९ डिसेंबर १९६१ ला गोवा स्वतंत्र झाला. भारतीय जवानांनी कारवाई करत अवघ्या ३६ तासांत गोवा मुक्त केला. त्यानंतर ३० मे १९८७ रोजी गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला आणि गोवा हे भारतीय प्रजासत्ताकचे २५ वे राज्य बनले.
१९८३ : फिफा वर्ल्डकप चषक चोरीला
आजच्याच दिवशी १९८३ मध्ये फिफा वर्ल्डकपची ट्रॉफी चोरीला गेली होती. ब्राझीलची राजधानी रिओ-डी-जनेरियो येथे ज्युल्स रिमे ट्रॉफी (त्यावेळी फिफा विश्वचषक ट्रॉफी याच नावाने ओळखली जात होती) चोरीला गेली. ब्राझिलियन फुटबॉल असोसिएशनच्या मुख्यालयात बुलेटप्रूफ काचेच्या शो केसमध्ये फिफाची ट्रॉफी ठेवण्यात आली होती. पण चोरांनी शिताफीने ट्रॉफी गायब केली.