७० षटके, २७० धावा, २३ विकेटस्
केपटाऊन : वृत्तसंस्था
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुस-या कसोटीच्या पहिल्याच दिवशी दि. ३ जानेवारी २०२४ रोजी २३ विकेटस् पडल्या. दोन्ही संघांचा पहिला डाव गडगडला असून, यजमान द. आफ्रिकेची दुस-या डावातही घसरगुंडी झालेली पाहायला मिळाली. मुकेश कुमारने दोन धक्के दिल्यानंतर जसप्रीत बुमराहने अप्रतिम चेंडूवर आफ्रिकेला दुस-या डावातही तिसरा धक्का दिला. बुमराहने ही विकेट घेताच कसोटी क्रिकेटमधील १३४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला गेला.
मोहमद सिराजच्या (६-१५) भेदक मा-याला जसप्रीत बुमराह व मुकेश कुमार (प्रत्येकी २ विकेट) याच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर गुंडाळला गेला. पण भारताची अवस्था काहीशी तशीच झाली. रोहित शर्मा (३९), शुभमन गिल (३६) व विराट कोहली (४६) यांच्या खेळीनंतरही भारताला पहिल्या डावात १५३ धावा करता आल्या. ४ बाद १५३ धावांवरून भारताने सहा फलंदाज एकही धाव न करता गमावले. नांदे्र, बर्गर, लुंगी एनगिडी व कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या.
भारताला पहिल्या डावात ९८ धावांची आघाडी घेता आली. दुस-या डावात द. आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर (१२) अपयशी ठरला. मुकेश कुमारने ही विकेट घेतली. त्यानंतर त्याने दुस-या षटकातही टॉनी जॉर्जीला बाद करून दुसरा धक्का दिला. जसप्रीत बुमराहच्या अप्रतिम चेंडूवर त्रिस्तान स्टब्स (१) माघारी परतला आणि आफ्रिकेला ४५ धावांवर तिसरा धक्का बसला. दक्षिण आफ्रिकेतील कसोटीच्या एका दिवसात २३ विकेटस् पडल्या.
१८९६ चा विक्रम मोडित
१८९६ मध्ये द. आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी २१ विकेटस् पडल्या आणि आज हा विक्रम मोडित निघाला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्याच दिवशी सर्वाधिक विकेटस् पडण्याची ही दुसरी वेळ आहे.