द. आफ्रिकेचा धुव्वा, भारताचा विजय
केपटाऊन : वृत्तसंस्था
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटी सामन्यात दि. ४ जानेवारी २०२४ रोजी ७ विकेट्सने विजय मिळवला. सामन्याच्या दुस-या दिवशी भारतासमोर विजयासाठी ७९ धावांचे लक्ष्य होते, जे सहज गाठले. या विजयासह भारतीय संघाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. सेंच्युरियन कसोटीत भारताला एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधील ही कसोटी केवळ ६४२ चेंडूंमध्ये निकाली लागली. त्यामुळे आजवरच्या इतिहासात ती सर्वात कमी चेंडूंमध्ये निकाली लागली.
१९३२ साली ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि ७२ धावांनी धुव्वा उडविला होता. त्यावेळी ती कसोटी केवळ ६५६ चेंडूंमध्ये निकाली निघाली होती. दरम्यान, केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव ३ बाद ६२ धावांवरून आज १७६ धावांत आटोपला. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी केवळ ७९ धावांचे लक्ष्य होते. कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या जोडीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी भारताच्या जसप्रीत बुमराने ६१ धावांत ६ फलंदाजांना माघारी धाडून दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली.
सेंच्युरियन कसोटीत भारताला एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. केपटाऊनमध्ये भारतीय संघाचा हा पहिलाच कसोटी विजय ठरला. याआधी केपटाऊनमध्ये झालेल्या ६ कसोटी सामन्यांत भारताला ४ वेळा पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर २ सामने अनिर्णित राहिले होते. भारतीय संघ १९९२ पासून दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर द्विपक्षीय कसोटी मालिका खेळत आहे. परंतु केपटाऊनमध्ये एकही कसोटी जिंकलेली नाही. आता त्यांनी केपटाऊनमधील विजयाचा दुष्काळ संपवला आहे.