२ सुपर ओव्हरचा थरार, भारताचा विजय शानदार

yongistan
By - YNG ONLINE

रोहित, रिंकूची मोठी भागीदारी, अफगाणची कडवी झुंज
बंगळुरू : वृत्तसंस्था
चिन्नास्वामी स्टेडियमवरअफगाणिस्तानविरोधातील तिसरा टी-ट्वेंटी सामना बुधवार, दि. १७ जानेवारी रोजी झाला. प्रथम फलंदाजी करताना भारताचे आघाडीचे फलंदाज बाद झाले. मात्र, रोहित शर्मा मैदानात पाय रोवून थांबला. त्याला रिंकू सिंगची साथ मिळाल्याने दोघांनी १९० धावांची भागिदारी करीत अफगाणिस्तानसमोर २१३ धावांचे आव्हान उभे केले. परंतु अफगाणिस्तानने चिवट फलंदाजी करीत बरोबरी साधली. त्यानंतर सुपर ओव्हर झाला. पण अफगाणिस्तानने १६ धावा काढलेल्या असताना भारताने बरोबरी साधली (जैयस्वाल अपयशी). त्यानंतर आणखी एक सुपर ओव्हर झाला. तेव्हा प्रथम फलंदाजी करताना भारताने ११ धावाच काढल्या. परंतु रोहितने रवी बिष्णोईला मैदानात उतरवून त्याच्या फिरकीच्या जोरावर अवघ्या १ धावेत २ विकेट घेऊन थरारक विजय मिळविला. हा सामना कायमच लक्षात राहणार आहे. कारण या सामन्यात एक नाही तर दोन सुपर ओव्हर झाल्या. 

रवि बिश्नोईने तीन चेंडूमध्ये दोन विकेट घेत भारताला थरारक विजय मिळवून दिला. त्यामुळे ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. कर्णधार रोहित शर्माने आज ट्वेन्टी ट्वेन्टीत शतक झळकावले. त्याचे हे टी-ट्वेंटीमधील पाचवे शतक ठरले. मात्र, या सामन्यात बरोबरी झाल्याने सुपर ओव्हर झाला. अफगाणिस्तान संघाने पहिल्या सुपर ओव्हरमध्ये १६ धावा कुटल्या. प्रत्युत्तरादाखल भारतालाही १६ धावाच काढता आल्या. त्यामुळे सुपर ओव्हरही टाय झाली. त्यामुळे दुसरी सुपर ओव्हर झाली. यामध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना ११ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्तान संघाला फक्त एक धाव काढता आली. रवि बिश्नोईने फक्त ३ चेंडूत २ फलंदाजांना तंबूत पाठवत अफगाणिस्तानचा खेळ खलास केला.  

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माने अवघ्या ६९ चेंडूत ११ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने नाबाद १२१ धावांची खेळी केली. त्याला रिंकू सिंगने नाबाद ६९ धावा करत चांगली साथ दिली. रिंकूने ३९ चेंडूत ६ षटकारांच्या मदतीने ६९ धावा केल्या. भारताने एकवेळ २२ धावांवर ४ फलंदाज गमावले होते. मात्र, रोहित-रिंकूच्या तब्बल १९० धावांच्या भागीदारीमुळे अफगाणिस्तान संघासमोर २१२ धावांचे आव्हान उभे केले. अफगाणिस्तान संघानेही कडवी झुंज देत २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात २१२ धावांपर्यंत मजल मारली. अफगाणिस्तानकडून गुरबाज, जादरन, गुलबादिन नैब आणि मोहम्मद नबी यांनी झंझावती खेळी केली. गुरबाज आणि जादरान यांनी ११ षटकात ९३ धावांची सलामी दिली. 

रोहित-रिंकूच्या ९० चेंडूत १९० धावा
तत्पूर्वी तिस-या टी-ट्वेंटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताची घसरगुंडी झाली. परंतु रोहित शर्मा आणि रिंकूने पाचव्या विकेटसाठी १९० धावांची भागिदारी केली. त्यांनी अवघ्या ९६ चेंडूत १९० धावा जोडल्या. यात रोहितने ११३ आणि रिंकूने ६९ धावांचे योगदान दिले. दुसरीकडे भारतीय गोलंदाजांचीही अफगाणी फलंदाजांनी धुलाई केली. त्यामुळे सामन्यात बरोबरी झाली. 

अखेरच्या पाच षटकात 
१०३ धावांचा पाऊस 
रोहित शर्मा आणि रिंकू सिंग याने अखेरच्या ५ षटकात १०३ धावांचा पाऊस पाडला. १६ व्या षटकात २२ धावा लुटल्यानंतर या जोडीने पुढील ४ षटकांतही धावांचा पाऊस पाडला. १७ व्या षटकात १३, १८ व्या षटकात १०, १९ व्या षटकात २२ आणि २० व्या षटकामध्ये ३६ धावा लुटल्या. 

रोहित शर्माचे विक्रमी पाचवे शतक
बंगळुरूच्या मैदानात रोहित शर्माने अनुभव पणाला लावत अफगाण गोलंदाजांची धुलाई केली. रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमधील पाचवे शतक ठोकले. त्यामुळे टी-२० क्रिकेटमध्ये पाच शतके ठोकणारा रोहित शर्मा पहिलाच खेळाडू ठरलाय्. याआधी असा पराक्रम एकाही फलंदाजाला करता आला नाही.