एमपीएससीत शेतकरी पुत्र विनायक पाटील राज्यात पहिला

yongistan
By - YNG ONLINE
पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ चा निकाल गुरुवार, दि. १८ जानेवारी २०२४ रोजी जाहीर झाला. यात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील विनायक पाटील यांनी ६२२ गुण मिळवत राज्यात पहिला क्रमांक मिळवला. पाटील यांनी हे यश तेविसाव्या वर्षी मिळवले असून, दुस-याच प्रयत्नात तो यशस्वी झाले. या निकालात धनंजय बांगर यांनी राज्यात द्वितीय तर सौरभ गावंडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला. त्याचप्रमाणे मुलींमधून सांगलीच्या वाळवा तालुक्यातील पूजा वंजारीने प्रथम क्रमांक पटकाविला.

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ विविध २३ संवर्गातील ६२३ पदांसाठी घेण्यात आली होती. राज्यसेवेची आतापर्यंतची सर्वाधिक पदांची भरती प्रक्रिया असल्याने राज्यभरातील उमेदवारांचे या निकालाकडे लक्ष लागले होते. मात्र, एमपीएससीच्या प्रशासनाने नवी मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर केंद्रावरील मुलाखती संपल्यानंतर एका तासानंतर निकाल जाहीर केला. या गुणवत्ता यादीत १८३० उमेदवारांचा समावेश आहे. 

विनायक पाटीलचे स्वअध्ययन
विनायक पाटील यांचे आई-वडिल शेतकरी असून, घरी दोन एकर जमीन आहे. त्यांनी बीएस्सी स्टॅटीस्टिकचे शिक्षण फर्ग्युसनमधून पूर्ण केले. राज्यसेवा मुख्य परीक्षेत प्रथम आलेल्या विनायक यांनी कोणत्याही प्रकारचा कोचिंग क्लास आणि टेस्ट सिरीज न लावता स्वअध्ययनावर भर दिला होता. त्यामुळेच राज्यसेवेच्या पहिल्या प्रयत्नात यशस्वी होत त्यांची उपशिक्षणाधिकारी पदावर नियुक्ती झाली होती. सध्या ते नागपूर येथे कार्यरत आहेत. त्यांनी काम सांभाळत दुस-या प्रयत्नांत राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला.

मुलींमध्ये पूजा वंजारी पहिली
मुलींमध्ये पहिल्या आलेल्या पूजा वंजारीने साधारण २०१५ पासून परीक्षेची तयारी सुरू केली होती. २०२० मध्ये यÞश मिळाल्यानंतर त्यांना सहाय्यक निबंधक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मात्र, लग्नानंतरही राज्यसेवेची तयारी सुरू ठेवली आणि अभ्यासात सातत्य ठेवले. त्यामुळे हे यश मिळाले. कुटुंबाचा भक्कम पाठिंबा मिळाल्याने नोकरी सांभाळत यश मिळवले आहे, असे मुलींमधून पहिली आलेल्या पूजा वंजारी सांगितले.