पाक-इराण युद्ध पेटले, सिया-सुन्नीत संघर्ष

yongistan
By - YNG ONLINE


तेहरान : रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानाच इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ला चढवून हमास हल्लेखोरांना नेस्तनाबूत करण्यासाठी चंग बांधला. त्यामुळे दोन्ही ठिकाणी हल्ले-प्रतिहल्ले सुरू असतानाच आता इराण-पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले आहे. इराणने मंगळवार दि. १६ जानेवारी २०२४ रोजी  पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी संघटना जैश अल अदलवर एअर स्ट्राईक केला. अचानक झालेल्या या एअर स्ट्राईकने जगाला धक्का बसला. इराणच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही ४८ तासांत पलटवार केला. गुरुवार, दि. १८ जानेवारी रोजी पहाटे इराणच्या सीमेपासून ५० कि.मी. अंतरावर बॉम्ब हल्ला केला. या हल्ल्यात ७ जण ठार झाले. या घटनेनंतर इराण-पाकिस्तानमधय्े संघर्ष आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिया (इराण) आणि सुन्नी (पाकिस्तान) यांच्यातील हा संघर्ष असल्याचे बोलले जात आहे.
इराण आणि पाकिस्तानचे सैन्य शक्तिशाली आहे. त्यामुळे भविष्यात या युद्धाचा भडका उडून याच्या झळा शेजारी देशांना बसण्याचा धोका आहे. त्यामुळे या युद्धाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटण्याची शक्यता आहे. इराणच्या हल्ल्याला पाकिस्तानने तातडीने उत्तर दिले आहे. या अगोदर अमेरिकेशी चर्चा झाली का, याची माहिती घ्यावी लागेल. मात्र, प्रत्युत्तरामुळे कुणी हल्ला केल्यास आपण थेट प्रत्युत्तर देऊ शकतो, हा संदेश पाकने दिला. त्यातच अलिकडे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाक लष्करावर आरोप केले होते. त्यांना लोकशाहीचा शत्रू ठरविले होते. मात्र, या हल्ल्यामुळे हा आरोपही निष्क्रिय ठरला आहे. 
अमेरिका इराणवर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग शोधत आहे. इराणच्या समर्थित गटांनी लाल समुद्र आणि इतर काही ठिकाणी अमेरिका आणि इस्रायलला त्रास दिला आहे. अशा स्थितीत युद्ध भडकले तर पाकिस्तानला अमेरिकेची मदत मिळू शकते. यात लष्करी आणि आर्थिक मदतही मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. यामुळे पाकिस्तान पुन्हा अमेरिकेच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. 

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अरब देश आणि विशेषत: सुन्नी बहुसंख्य देश इराणच्या वाढत्या सामर्थ्याने चिंतेत आहेत. अशा स्थितीत इराण-पाकिस्तानमधील संघर्ष पेटल्यास अरब देशांकडूनही मदत मिळू शकते. त्यामुळे या युद्धात पाकिस्तानला अधिक फायदा होऊ शकतो. अलिकडील हल्ल्यामुळे इराणचा अरब जगतातील प्रभावही कमी झाला आहे. मात्र, दोन्ही देशांत जास्त काळ युद्ध होऊ शकत नाही. त्यामुळे तडजोडी होण्याचीही शक्यता आहे. 

९०९ किमी. लांबीच्या सीमेवर इराण आणि पाकिस्तानचे सैन्य समोरासमोर आले आहे. सैनिक आणि शस्त्रास्त्रे दोन्ही बाजूंनी जमा झाली आहेत. एकीकडे इराणचा सिस्तान प्रांत आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा बलुचिस्तान प्रांत सीमेला लागून आहे. ही जागा कुह ए मलिक सालीह डोंगराळ भाग आहे. या भागाच्या दक्षिण-पश्चिमेस तहलब नदी आणि पूर्वेकडे मश्किल नदी आहे. दक्षिण दिशेला नहंग नदी असून, डोंगराच्या पलिकडे तुम्ही ग्वादर खाडी आणि अमन खाडीपर्यंत जाऊ शकता. या भागासाठी इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात कायम संघर्ष असतो. 

१९५८-५९ मध्ये आखून घेतली सीमा
पाकिस्तानने इराणसोबत १९५८-५९ मध्ये सीमा आखून घेतली. त्या मैदानात पिलर्स उभे केले. जून २०२३ मध्ये या सीमेजवळ एक दहशतवादी हल्ला झाला. त्यात पाकिस्तान सीमेवर तैनात काही सैनिक मारले गेले. त्यानंतर काही दिवसांत याच सीमेवर इराणच्या बाजूस दहशतवादी हल्ला झाला. त्यात ५ इराणी सैनिक मारले गेले. सध्या पाकिस्तान-इराण सीमेवर तणावाची स्थिती आहे.