मुंबई : प्रतिनिधी
आपल्या सहजसुंदर अभिनयातून निर्मळ आणि खुसखुशीत विनोदाची पेरणी करीत गेली अनेक दशके सिनेमा, नाटकांतून प्रेक्षकांच्या चेह-यावर हास्य फुलविणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना दि. ३० जानेवारी २०२४ रोजी सन २०२३ चा महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. २५ लाख रुपये आणि मानपत्र असे महाराष्ट्रभूषण पुरस्काराचे स्वरूप आहे.
अशोक सराफ यांचे कला क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन हा पुरस्कार देण्यात येत असल्याचे शिंदे म्हणाले. ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांचे कला क्षेत्रात भरीव योगदान आहे. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले, असा गौरव मुख्यमंत्र्यांनी केला. महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अनेक मान्यवरांनी अशोक सराफ यांचे अभिनंदन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशोक सराफ यांचे अभिनंदन केले. सराफ यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार कला क्षेत्रातील प्रदीर्घ दैदीप्यमान कारकिर्दीचा, मराठीतील सुपरस्टार अभिनेत्याचा, महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव आहे, असे ते म्हणाले.
३०० हून अधिक चित्रपटांत काम
अशोक सराफ यांनी आतापर्यंत ३०० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ‘पांडू हवालदार’ सिनेमातली ‘सखाराम हवालदार’ आणि अशी ही बनवाबनवी या चित्रपटातील धनंजय माने यांची भूमिका प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे. ‘पांडू हवालदार’ या सिनेमात त्यांनी दादा कोंडकेंसह अभिनय केला. ‘राम राम गंगाराम’ या दोन चित्रपटांमध्ये दादा कोंडके यांच्यासह त्यांनी भूमिका केल्या. त्यांनी दादा कोंडकेंसह सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे अशा दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले.
अशोक सराफ यांची कारकिर्द
अशोक सराफ हे मूळचे बेळगावचे रहिवासी. त्यांचा जन्म मुंबईत झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होते. त्यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी. टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासून नाटकांची आवड होती. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ययाती आणि देवयानी या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवले. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या.