देशात मानवी तस्करी २४ टक्क्यांनी वाढली

yongistan
By - YNG ONLINE

एनसीआरबीचा रिपोर्ट, देशात सरासरी रोज ६ गुन्ह्यांची नोंद
नवी दिल्ली : भारतात मानवी तस्करी मोठी समस्या आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार (एनसीआरबी) देशात रोज सरासरी ६ गुन्ह्यांंची नोंद होते. सक्तीचे श्रम आणि लैंगिक शोषण/वेश्या व्यवसायासाठी सर्वाधिक तस्करी केली जाते. तीन वर्षांत (२०२० ते २०२२) मानवी तस्करीत २४ टक्क्यांनी वाढ झाली. २०२० मध्ये १,७१४ प्रकरणे नोंदवली गेली, २०२२ मध्ये ती वाढून २,२५० झाली.चिंतेची बाब म्हणजे, १६ टक्के प्रकरणांत पोलिस आरोपपत्र दाखल करत नाहीत. सुमारे ८० टक्के प्रकरणांमध्ये आरोपींची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता होते.

 युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार धमकावणे, बळाचा वापर करणे, एखाद्या व्यक्तीला इकडे-तिकडे नेणे किंवा एखाद्या व्यक्तीला ओलीस ठेवणे यासारखे कृत्ये मानवी तस्करीच्या श्रेणीत येतात. मानवी तस्करीच्या बहुतांश घटनांत लहान मुले किंवा मुलींचा समावेश असतो. मानवी तस्करीच्या बाबतीत भारत जगातील अव्वल देशांमध्ये आहे. भारतातून पश्चिम आशिया, उत्तर अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये मानवी तस्करी होते. वेश्याव्यवसायासाठी मुलींची तस्करी केली जाते. 

  सर्वांधिक तक्रारी तेलंगणा आणि महाराष्ट्रात
मानवी तस्करीची सर्वाधिक प्रकरणे तेलंगणा आणि महाराष्ट्रात नोंदली गेली आहेत. एनसीआरबीच्या अहवालानुसार, २०२० मध्ये तेलंगणा आणि महाराष्ट्रात १८४-१८४ प्रकरणे नोंदवली गेली तर २०२१ मध्ये तेलंगणात ३४७ आणि महाराष्ट्रात ३२० प्रकरणे नोंदवली गेली होती. तेलंगणात २०२२ मध्ये प्रकरणे वाढली, तर महाराष्ट्रात काही प्रमाणात घट झाली. २०२३ या वर्षी तेलंगणात ३९१ आणि महाराष्ट्रात २९५ मानवी तस्करीचे गुन्हे दाखल झाले आहेत. 

 ५९.५ टक्के महिला तस्करीचे बळी 
भारतातील मानव तस्कर, ४०.५ टक्के पुरुष आणि ५९.५ टक्के महिलांना लक्ष्य करत आहेत. गेल्या तीन वर्षात तस्करीच्या १६,५८५ बळींपैकी १०,४५३ महिला होत्या. २०२१ मध्ये ६२  टक्के महिला आणि ३८ टक्के पुरुष मानवी तस्करीचे बळी ठरले.