जपानसह ६ देशाचे पासपोर्ट भारी

yongistan
By - YNG ONLINE

१०४ देशांच्या यादीत भारताचा ८० वा क्रमांक
नवी दिल्ली : जगातील सर्वांत प्रभावशाली पासपोर्टच्या २०२४ मधील यादीत एक-दोन नाही तब्बल सहा देशांनी सर्वोच्च स्थान मिळविले. फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर आणि स्पेन या देशांचे पासपोर्ट सर्वांत प्रभावी ठरले आहे. या यादीत भारताचा क्रमांक ८० वा आहे. एकूण १०४ देशांच्या यादीत पाकिस्तानचे नाव १०१ व्या स्थानी असून अफगाणिस्तान तळात आहे.

 हेन्ले पासपोर्ट इंडेक्स ने आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (आयटा) माहितीच्या आधारे ही नवी क्रमवारी जाहीर केली. यादीतील पहिल्या ६ देशांच्या पासपोर्टधारक नागरिकांना जगातील १९४ देशांत व्हिसामुक्त प्रवेशास परवानगी आहे. गेल्या ५ वर्षांपासून जपान आणि सिंगापूरने सातत्याने पहिल्या क्रमांकावर वर्चस्व राखले आहे. यंदा युरोपीय देशांनी पहिल्या क्रमांकावर उडी घेतली. मात्र, भारताचा पासपोर्ट हा जगातील ८० वा शक्तीशाली पासपोर्ट ठरला आहे. गेल्यावर्षी २०२३ मध्ये भारताचा क्रमांक ८३ वा होता. 

६२ देशांत व्हिसामुक्त प्रवेश
या रँकिंगनुसार भारतीय पासपोर्ट उझबेकिस्तानसह ८० व्या क्रमांकावर आहे. आता भारतातील लोकांना ६२ देशांत व्हिसामुक्त प्रवेश मिळू शकतो. या देशांत भूतान, ब्रिटिश व्हर्जिन बेटे, बार्बाडोस, थायलंड, जॉर्डन, मलेशिया, मालदीव, श्रीलंका, मॉरिशस आणि इंडोनेशिया आदींचा समावेश आहे.

भारतानंतर या देशांचा क्रमांक 
यापूर्वी २०२३ मध्ये भारतीय पासपोर्टची रँकिंग ८३ होती. आता २०२४ मध्ये भारतानंतर भूतान, इजिप्त, जॉर्डन, व्हिएतनाम, म्यानमार, अंगोला, मंगोलिया, मोझांबिक, ताजिकिस्तान, मादागास्कर, बुर्किना फासो, कोटे डीआयव्होरी, इक्वेटोरियल गिनी, सेनेगल, अल्जेरिया, कंबोडिया आणि माली या देशांचा समावेश. 

या देशांच्या पासपोर्टला विशेष महत्त्व
शक्तिशाली पासपोर्टबद्दल बोलायचे झाले तर फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर आणि स्पेन या देशांचा क्रमांक वरचा आहे. या देशांतील लोक व्हिसाशिवाय १९४ देशांना भेट देऊ शकतात. त्यांच्यापाठोपाठ फिनलंड, स्वीडन आणि दक्षिण कोरिया यांचा क्रमांक लागतो. ज्यात १९३ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश आहे. ऑस्ट्रिया, डेन्मार्क, आयर्लंड आणि नेदरलँड्सचे पासपोर्ट १९२ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेशासह संयुक्तपणे तिस-या क्रमांकावर आहेत.

पाकिस्तानचा पासपोर्ट कमकुवत
शेजारी देश पाकिस्तानचा पासपोर्ट हा जगातील चौथ्या क्रमांकाचा कमकुवत पासपोर्ट आहे. हेन्ली पासपोर्ट इंडेक्समध्ये इराक, सीरिया आणि अफगाणिस्तानमधील पासपोर्टही खालच्या क्रमांकावर आहेत.