१० जानेवारी : ताश्कंद करार, सुरतेवर स्वारी

yongistan
By - YNG ONLINE
१० जानेवारी रोजी अनेक महत्वाच्या घटना घडल्या आहेत. १९६५ च्या युद्धानंतर भारत-ताश्कंदमध्ये आजच्या दिवशी करार झाला. सुरतेवर स्वारी करून छत्रपती शिवाजी महाराजांचे राजगडाकडे प्रयाण आजच्या दिवशी झाले. 

जागतिक हिंदी दिवस : जगभरात आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून हिंदीबाबत जनजागृती करण्यासाठी १० जानेवारी रोजी दरवर्षी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो तर राष्ट्रीय हिंदी दिवस १४ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. 
१६६६ : सुरतेवर स्वारी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सूरतवरील छाप्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील घेण्यात आली. मुघल साम्राज्यातील जागतिक व्यापारी आणि आर्थिक केंद्र असणा-या सुरतवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वात छापा मारण्यात आला. सुरतेच्या बंदरातून भारताचा जगातील इतर देशांसोबत व्यापार चाले. कापड, मसाल्याचे जिन्नस, चंदन, कस्तुरी, हस्तिदंताच्या सुशोभित वस्तू, अत्तर, रेशीम, जरीचे कापड, नक्षीदार भांडी, गालिचे आदी व्यापार येथे होता. सुरतमधील छाप्यात सोने,चांदी,हिरे, मोती भरपूर सापडले. सूरतचा सुभेदार  इनायतखान याने कपटाने शिवाजी महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मावळ््यांंनी हा हल्ला परतवून लावला. त्यानंतर चिडलेल्या मावळ््यांनी सूरतमध्ये स्वारी करत मोठी संपत्ती मिळवली. सूरतवरील स्वारी औरंगजेबाच्या साम्राज्याला मोठा धक्का बसला. 

१७३० : शनिवारवाड्याचे बांधकाम सुरू 
पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली. शनिवारवाड्याच्या पायाभरणीचे काम १० जानेवारी १७३० रोजी सुरू झाले तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांत करण्यात आली. त्या दिवशी शनिवार होता, म्हणून शनिवारवाडा असे नाव पडले. १७३२ नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे, बदल होत राहिले. बुरुजाच्या दरवाजाचे काम होण्यास १७६० हे वर्ष उजाडले. अठराव्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, अर्थात पेशवे यांचे निवासस्थान आणि कार्यालय होते. शनिवारवाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि चारही बाजूने एकूण ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. 

१८७० : स्टँडर्ड ऑईल’ कंपनीची स्थापना
जॉन डी. रॉकफेलर याने ’स्टँडर्ड ऑईल’ कंपनीची स्थापना केली. ही जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक, परिवहन, शुद्धीकरण आणि विक्री करणारी कंपनी होती. 
१८७० : चर्चगेट रेल्वे स्थानकाची सुरुवात
मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाची १० जानेवारी १८७० रोजी सुरुवात झाली. बॉम्बे, बडोदा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे या ब्रिटिशकालीन रेल्वे कंपनीच्या अखत्यारीत स्थानकाची सुरुवात झाली. 

१९२० : पहिले महायुद्ध संपुष्टात
व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले. पहिल्या महायुद्धानंतर मित्र राष्ट्रे व जर्मनी यांमध्ये २८ जून १९१९ रोजी व्हर्साय येथे तह झाला होता. याला ‘पॅरिसचा तह’ म्हणूनही ओळखला जातो. 
१९६६ : भारत-पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार 
१० जानेवारी १९६६ रोजी झाला. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानने सपशेल पराभव दिसत असताना इतर देशांच्या मध्यस्थीने हा करार करण्याचा प्रस्ताव मांडला. ४ ते १० जानेवारी १९६६ मध्ये ताश्कंद येथे झालेल्या बैठकीत संयुक्त राष्ट्रे, अमेरिकी सरकारचे प्रतिनिधी आणि सोव्हिएत रशियन सरकारचे वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी झाले होते. या करारानंतर पाकिस्तानने भारतावर केलेल्या आक्रमणानंतर सुरू झालेल्या युद्धाची समाप्ती झाली. 

१८७० : पानिपतच्या युद्धात मराठा सैन्याचे शूर सेनापती रणवीर दत्ताजी शिंदे यांचा बलिदान दिवस. नजीबखानने त्यांना ठार केले. नजीबने त्यांना विचारले होते क्यूँ मरहट्टे और लढोगे? त्यावर दत्ताजीने दिलेले क्यूँ नही, बचेंगे तो और भी लढेंगे हे उत्तर अजरामर झाले. 

१७७५ : बाजीराव पेशवे (दुसरे) यांचा जन्म 

१९४० : सुप्रसिद्ध गायक के. जे. येसूदास यांचा जन्म