रोहन बोपन्नाने रचला इतिहास

yongistan
By - YNG ONLINE
ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष दुहेरीत जेतेपद, पहिले ग्रँडस्लॅम जिंकले

मेलबर्न : वृत्तसंस्था
रोहन बोपन्ना आणि त्याचा पार्टनर मॅथ्यूज एब्डनने ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ च्या पुरूष दुहेरीचे विजेतेपद दि. २७ जानेवारी २०२४ रोजी पटकावले. त्यांनी इटालियन जोडी सिमोने आणि अँड्रियाचा ७-६ (७-०), ७-५ असा पराभव केला. बोपन्नाने वयाच्या ४३ व्या वर्षी पहिले ग्रँडस्लॅम जिंकले. यापूर्वी बोपन्ना हा यूएस ओपनमध्ये दोनवेळा फायनलमध्ये पोहचला होता.

२०१० आणि २०२३ मध्ये फायनल गाठली होती. मात्र, त्याला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती. अखेर ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ च्या पुरूष दुहेरीचे विजेतेपद मिळवत रोहन बोपन्ना ओपन एरामध्ये पुरूष दुहेरीत रँकिंगमध्ये अव्वल असणारा आणि ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला.

ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ च्या पुरूष दुहेरीच्या अंतिम फेरीत रोहन बोपन्ना आणि मॅथ्यूज एब्डन यांचा मुकाबला सिमोने आणि अँड्रिया या इटालियन जोडीशी झाला. या जोडीने रोहन बोपन्ना आणि मॅथ्यूज एब्डनला कडवी झुंज दिली. परंतु अखेरच्या टप्प्यात या जोडीने जोरदार मुसंडी मारत जेतेपद पटकावले.

सर्वाधिक वयाचा टेनिसपटू
४३ व्या वर्षी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेणारा रोहन हा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू ठरला. याआधी हा विक्रम अमेरिकेच्या राजीव रामच्या नावावर होता. राजीवने ऑक्टोबर २०२२ रोजी ३८ व्या वर्षी दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा रोहन हा केवळ चौथा भारतीय टेनिसपटू ठरणार आहे. याआधी लिअँडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांनीच ही किमया केली आहे.