इस्रोची भरारी, भारताचा सर्वांत आधुनिक उपग्रह निश्चित कक्षेत
विशाखापट्टणम : वृत्तसंस्था
इस्रोने १० वर्षांसाठी हवामानाची अचूक माहिती देणारा इनसॅट-३ डीएस हा उपग्रह शनिवार, दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रक्षेपित केला. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून शनिवारी सायंकाळी ५:३५ वाजता प्रक्षेपित करण्यात आले. जीएसएलव्ही-एफ १४ रॉकेटमधून हा उपग्रह सोडण्यात आला. हे जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट म्हणजेच पृथ्वीच्या वरच्या कक्षेत ३७००० किलोमीटर उंचीवर १९ मिनिटे १३ सेकंदात पोहोचले.
इस्रोच्या नॉटी बॉय रॉकेटच्या मदतीने इनसॅट-३ डीएस या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. हा भारताचा सर्वात आधुनिक हवामान उपग्रह आहे. यामुळे हवामानाची आणि नैसर्गिक संकटांची अचूक माहिती मिळू शकणार आहे.इनसॅट-३ सीरीजमध्ये आधीपासून सहा वेगवेगळ््या प्रकारचे उपग्रह आहेत. आता यामध्ये हा सातवा उपग्रह जोडला गेला आहे. या उपग्रहामध्ये इमेजर पेलोड, साऊंडर पेलोड, डेला रिले ट्रान्सपाँडर आणि सॅटेलाईट अँड रिसर्च रेस्क्यू ट्रान्सपाँडर असे पेलोड देण्यात आले आहेत. या उपग्रहाचा मुख्य उद्देश जमीन, समुद्र, हवामान आणि इमर्जन्सी सिग्नल सिस्टीम या गोष्टींची माहिती देणे हा आहे. यासोबतच मदत आणि बचाव कार्यातही याचे सहकार्य होणार आहे.
नॉटी बॉय रॉकेटचा वापर
या मोहिमेसाठी इस्रोने नॉटी बॉय या रॉकेटचा वापर केला होता. जीएसएलव्ही रॉकेटचे हे १६ वे उड्डाण होते. तसेच स्वदेशी क्रायोजेनिक स्टेजचे हे १० वे उड्डाण होते. हे उड्डाण अगदी यशस्वीपणे पार पडल्यामुळे आता नॉटी बॉय हा नॉटी राहिला नाही. तो अगदीच मॅच्युअर आणि डिसिप्लिन्ड बॉय झाल्याचे मत मिशन डायरेक्टर टॉमी जोसेफ यांनी व्यक्त केले.
विविध विभागांना देणार सेवा
२२७४ किलो वजनाचा उपग्रह, एकदा कार्यान्वित झाल्यानंतर पृथ्वी विज्ञान, हवामानशास्त्र विभाग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी, हवामान अंदाज केंद्र आणि भारतीय राष्ट्रीय केंद्र अंतर्गत विविध विभागांना सेवा देईल.
ढग, धुके, पावसाचा अभ्यास
-५१.७ मीटर लांबीच्या रॉकेटमध्ये इमेजर पेलोड, साउंडर पेलोड, डेटा रिले ट्रान्सपॉन्डर आणि सॅटेलाइट अॅडेड सर्च आणि रेस्क्यू ट्रान्सपॉन्डर असेल. ज्याचा उपयोग ढग, धुके, पाऊस, बर्फ आणि त्याची खोली, आग, धूर, जमीन आणि महासागर यांचा अभ्यास करण्यासाठी केला जाणार आहे.