गुंतवणूक, वीज, व्यापार, डिजिटल पेमेंटचा समावेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत आणि यूएई यांच्यात द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करणारे आणि सहकार्याला चालना देणारे ८ महत्त्वपूर्ण करार झाले. यात गुंतवणूक, वीज, व्यापार, डिजिटल पेमेंट यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूएईचे अध्यक्ष मोहंमद बीन झायेद नहयान यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी करारावर शिक्कामोर्तब झाले.
दोन देशांच्या दौ-यावर असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अबुधाबी येथे आगमन झाले. यावेळी मोदी आणि यूएईचे अध्यक्ष नहयान यांच्यात प्रादेशिक स्थिती आणि जागतिक मुद्यावर चर्चा झाली. आजच्या मुक्त व्यापार करारामुळे (एफटीए) उभय देशातील व्यापाराला आणि व्यवहारांना बुस्ट मिळणार आहे. उभय नेत्यांच्या चर्चेनंतर द्विपक्षीय गुंतवणूक संधीकरारांसह आठ करारांचे आदान-प्रदान करण्यात आले.
भविष्यात हे करार उभय देशांतील संबंध आणखी वाढीस लागण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असा आशावाद परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केला. तात्काळ पेमेंट भरणा करणारे भारताचे प्लॅटफॉर्म युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) आणि यूएईचे ‘एएएनआय’, देशार्तंगत डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड तसेच भारताचे रूपे कार्ड यास यूएईच्या ‘जयवान’ला जोडण्यासंदर्भात वेगवेगळ््या करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या.‘जयवान’ पेमेंट प्रणालीचे अनावरण केल्याबद्दल मोदी यांनी मोहंमद बीन झायेद यांचे अभिनंदन केले. ही प्रणाली डिजिटल रूपे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर आधारित आहे. यावेळी ‘जयवान’ कार्डद्वारे व्यवहार करत अनौपचारिक उद्घाटन केले.