नवी दिल्ली : वृत्तसंस्था
प्रसिद्ध उर्दू गीतकार आणि कवी गुलजार आणि संस्कृत अभ्यासक जगद्गुरु रामभद्राचार्य यांना शनिवार, दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी २०२३ चा ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. दोन्ही दिग्गज आपापल्या क्षेत्रात खूप प्रसिद्ध आहेत. गुलजार हे प्रख्यात कवी आहेत, तर जगद्गुरू रामभद्राचार्य जन्मापासून अंध असूनही संस्कृत भाषा, वेद पुराणाचे अभ्यासक आहेत. त्यामुळे त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. या अगोदर गोव्यातील लेखक दामोदर मौजो यांना २०२२ चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.
गुलजार यांनी अनेक चित्रपटांमध्ये गाणी लिहिण्याबरोबरच गझल आणि कविता क्षेत्रात मोठी ख्याती मिळवली आहे. ते या काळातील सर्वोत्कृष्ट उर्दू कवींपैकी एक मानले जातात. काव्य आणि चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी त्यांना २००२ मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, २०१३ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, २००४ मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला. याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीतील विविध कामांसाठी त्यांना ५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. आता त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. गुलजार यांचे खरे नाव संपूर्णसिंह कालरा असे आहे. ऑगस्ट १९३६ साली त्यांचा जन्म पाकिस्तानमध्ये असलेल्या दीना शहरात झाला होता. फाळणीनंतर गुलजार यांचे कुटुंबिय अमृतसरला आले. तेथून गुलजार यांनी मुंबई गाठली होती.
दरम्यान, चित्रकूटमधील तुलसीपीठाचे संस्थापक आणि प्रमुख रामभद्राचार्य हे प्रसिद्ध हिंदू आध्यात्मिक गुरू, शिक्षक आणि १०० हून अधिक पुस्तकांचे लेखक आहेत. ते अंध असूनही संस्कृत भाषा आणि वेद-पुराणांचे मोठे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. संस्कृत साहित्यिक जगद्गुरू रामभद्राचार्य यांना संस्कृत साहित्यातील योगदानाबद्दल २०२३ चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. त्यांनी शंभराहून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. जन्मानंतर दोन महिन्यांनी दृष्टी गमावणारे रामभद्राचार्य हे सर्वोत्तम शिक्षक आणि संस्कृत भाषेचे विद्वानही आहेत.
उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात शंडीखुर्द येथे मकरसंक्रांतीच्या दिवशी १४ जानेवारी १९५० रोजी रामभद्राचार्य यांचा एका ब्राम्हण कुटुंबात जन्म झाला. जन्मानंतर त्यांच्या दोनही डोळ््याला संसर्ग झाला. त्यातूनच त्यांची दृष्टी कमी झाली. तेव्हा ते दैवी दृष्टीद्वारे जग पाहू लागले. त्यांना कधी वाचन करावे लागले नाही किंवा लिखाण करावे लागले नाही. तसेच ब्रेल लिपीचाही वापर करावा लागला नाही.
श्रवणाच्या बळावर शास्त्रावर प्रभूत्व
केवळ श्रवणाच्या बळावर त्यांनी शास्त्रावर प्रभुत्व मिळवले. गिरिधर असे त्यांचे नाव. त्यांचे प्राथमिक शिक्षण आजोबा पंडित सूर्यबली मिश्रा यांच्या घरी झाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी संस्कृतमधील संपूर्ण भगवतगीता अध्याय आणि श्लोक क्रमांकांचे पाठांतर केले. आजोबांच्याा मदतीने वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी संत तुलसीदासाचे संपूर्ण रामचरितमानस पूर्ण केले. वेद, उपनिषद, भागवतपुराण, संस्कृत व्याकरण आदींत प्रभुत्व मिळवले.
२२ भाषांचे ज्ञान
रामभद्राचार्य यांना २२ भाषेचे ज्ञान आहे. त्यांना २०१५ मध्ये पद्मविभूषण देऊन गौरविण्यात आले आहे. रामभद्र यांनी श्रीभार्गवराघवीयम, अष्टावक्र, आझादचंद्रोखरचरितम, लघुरघुवरम, सरयूलहरी, भृंगदूतम, कुब्जापत्रम आदी ग्रंथ लिहिले आहेत.