अबुधाबीत भारत मार्टचे उद्घाटन

yongistan
By - YNG ONLINE

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या यूएई दौ-यादरम्यान दि. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी भारतातील लघु उद्योजक आणि व्यापा-यांसाठी गोदाम सुविधा असलेल्या ‘भारत मार्ट’चे उद्घाटन केले. भारत मार्ट चीनच्या ड्रॅगन मार्ट या गोदाम सुविधेला टक्कर देण्यासाठी सज्ज आहे.

भारत मार्ट ही एक गोदाम सुविधा आहे; जी संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथे व्यापार आणि विविध उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी प्रमुख व्यासपीठ असेल. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार भारत मार्टमध्ये शोरूम, गोदामे, कार्यालये आणि इतर सहायक सुविधा असतील. त्यात जड मशिनरीपासून ते किरकोळ वस्तूंपर्यंत सर्व श्रेणीतील वस्तूंचा समावेश असेल. मुख्य म्हणजे ‘भारत मार्ट’ विविध श्रेणींच्या भारतीय उत्पादनांसाठी ‘वन स्टॉप शॉप’ म्हणून काम करेल. 
याचा अर्थ असा की, इथे एकाच छताखाली सर्व वस्तू उपलब्ध असतील. भारत मार्ट भारतीय कंपन्यांना आफ्रिका आणि युरोपसह युनायटेड स्टेट्समध्ये व्यापाराचा विस्तार करण्यास मदत करेल, असे अधिका-यांचे म्हणणे आहे.

१००००० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्र व्यापणारी ही सुविधा दुबईच्या जेबेल अली फ्री झोनमध्ये स्थापन केली जाईल, ज्याचे व्यवस्थापन डीपी वर्ल्डद्वारे केले जाते. भारत मार्टमध्ये किरकोळ शोरूम, गोदामे, कार्यालये आणि इतर सुविधा असतील. यात जड यंत्रांपासून ते नाशवंत वस्तूंपर्यंत विविध श्रेणीतील वस्तूंचा समावेश असेल. दोन्ही देशांनी २०३० पर्यंत त्यांचे गैर-पेट्रोलियम व्यापाराचे लक्ष्य दुप्पट करून १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारतातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम क्षेत्रांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी ही सुविधा महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा आहे.

यूएई भारताचा तिसरा मोठा व्यापारी भागीदार देश
भारत मार्टमुळे भारतीय निर्यातदारांना मोठ्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली उत्पादने प्रदर्शित करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे भारत-यूएई व्यापार संबंधदेखील मजबूत होतील. २०२२-२३ पर्यंत संयुक्त अरब अमिरात (यूएई) सोबतचा भारताचा व्यापार ८५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. भारतात ३.५ बिलियन डॉलरच्या गुंतवणुकीसह थेट परकीय गुंतवणुकीमध्ये (एफडीआय) संयुक्त अरब अमिरात चौथ्या क्रमांकाचा देश व भारताचा तिसरा सर्वांत मोठा व्यापारी भागीदारदेखील आहे.