३ फेब्रुवारी रोजी बनारस हिंदू विद्यापीठाचा स्थापना दिन आहे. यासोबतच या दिवशी बोरीबंदर ते कुर्ला दरम्यान विजेवर धावणारी पहिली लोकल सुरू झाली. त्यामुळे या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे.
१९१६ : बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना
बनारसमधील बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना ३ फेब्रुवारी १९१६ रोजी झाली. स्वातंत्र्यसेनानी पंडित मदन मोहन मालवीय यांनी वसंत पंचमीच्या दिवशी या विद्यापीठाची स्थापना केली. डॉ. अॅनी बेझंट यांनी विद्यापीठाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली.
१९२५ : विजेवर धावणारी पहिली लोकल सुरू
३ फेब्रुवारी १९२५ रोजी पहिली विजेवर धावणारी लोकल तेव्हाच्या व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून कुर्ल्यापर्यंत हार्बर मार्गावर चालवण्यात आली होती. ३ फेब्रुवारी १९२५ रोजी केवळ चार डबे घेऊन ही लोकल धावली होती. तिचा वेग ताशी ५० मैल इतका होता. डबे हे लाकडी बनावटीचे होते. त्यात मध्ये लोखंडाचा देखील वापर करण्यात आला होता. मध्य रेल्वेला आधी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे ही कंपनी चालवायची. याच कंपनीने ही विजेवर धावणारी लोकल चालवली होती. त्यावेळी वृत्तपत्रात भारतात एका प्रदूषणरहित नवीन युगाची सुरुवात, अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर नवनवे तंत्रज्ञान घेऊन लोकल मध्य आणि पश्चिम रेल्वेवर धावू लागल्या. इतकेच नाही तर विजेवर चालणारे इंजिन देखील बनवले गेले आणि लांब पल्ल्याच्या गाड्या विजेवर धावू लागल्या. त्यामुळे प्रदूषण रोखण्यास मदत झाली.
१९३८ : प्रसिद्ध अभिनेत्री वहिदा रहमान यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९३८ रोजी झाला. वहिदा रेहमान यांच्या संपूर्ण कारकिर्दीत फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
१९६३ : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा जन्म. रघुराम राजन हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे २३ वे गव्हर्नर होते. ४ सप्टेंबर २०१३ रोजी डी. सुब्बाराव यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी हे पद स्वीकारले. त्याआधी ते तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार होते. रघुराम राजन यांनी एरिक जे. बूथ स्कूल ऑफ बिझनेस शिकागो विद्यापीठात प्रोफेसरचे काम केले.
१९६९ : सी एन अन्नादुराई यांचे निधन
कांजीवरम नटराजन अन्नादुराई हे तमिळनाडूतील लोकप्रिय राजकारणी होते. तामिळनाडूचे ते पहिले बिगर-काँग्रेस मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे संस्थापक होते. आधुनिक तामिळनाडूचे जनक असेही त्यांची ओळख आहे.
२०१८ : चौथ्यांदा अंडर-१९ विश्वचषक जिंकला
३ फेब्रुवारी हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी एक संस्मरणीय दिवस होता. या दिवशी भारताने चौथ्यांदा अंडर-१९ क्रिकेट विश्वचषक जिंकला. न्यूझीलंडच्या ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाचा आठ गडी राखून पराभव केला.
इतर महत्त्वाच्या घटना
१७६० : सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने उदगीरच्या लढाईत निजामाच्या सैन्याचा पराभव केला.
१९७१ : चंद्रावरील तिस-या यशस्वी मानव मोहिमेदरम्यान अमेरिकेचे अंतराळयान अपोलो १४ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले.
१९८८ : आयएनएस चक्र पाणबुडीचा नौदलात समावेश. आयएनएस चक्र ही पहिली आण्विक शक्ती असलेली पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात आली.