सर्वाधिकवेळा ५ विकेट घेणारा गोलंदाज
रांची : वृत्तसंस्था
भारताचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीच्या दुस-या डावात दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी १५.५ षटकात ५१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. यासोबतच अश्विनने ९९ कसोटीत ३५ वेळा ५ विकेट घेण्याचा पराक्रम केला. त्याने अनिल कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो आता कुंबळेसोबत भारतीय कसोटी इतिहासात सर्वाधिकवेळा ५ विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात अश्विनला फार काही चांगली कामगिरी करता आली नव्हती. मात्र, दुस-या डावात त्याने संघाला गरज असताना दमदार मारा करत इंग्लंडचा निम्मा संघ गारद केला. अश्विनने आतापर्यंत ९९ कसोटी सामन्यात ३५ वेळा पाच विकेट्स घेतल्या तर २४ वेळा ४ विकेट्स घेतल्या. त्याने फलंदाजीतही दमदार कामगिरी करत ५ शतके आणि १४ अर्धशतके ठोकली आहेत.
दरम्यान, चौथ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावात गुंडाळला. भारताला विजयासाठी १९२ धावांची गरज आहे. तिस-या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी भारताने बिनबाद ४० धावा केल्या असून यशस्वी जैस्वाल १६ तर रोहित शर्मा २७ धावा करून नाबाद आहे. भारताला विजयासाठी अजून १५२ धावांची गरज आहे.
कसोटीत सर्वाधिक
विकेट घेणारा गोलंदाज
अश्विन हा भारतात सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा गोलंदाजदेखील ठरला आहे. त्याने या बाबतीत अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. अनिल कुंबळने भारतात ३५० कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने ३५१ विकेट्स घेत त्याला मागे टाकले. या यादीत तिस-या क्रमांकावर हरभजन सिंग आहे. त्याने २६५ विकेट्स घेतल्या तर कपिल देव यांनी भारतात २१९ कसोटी विकेट्स घेतल्या असून ते या यादीत चौथ्या स्थानावर आहेत तर रविंद्र जडेजा २१० विकेट्स घेत पाचव्या स्थानावर आहे.