नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात सध्या ५४ अणुभट्टया कार्यरत आहेत. २०३१-३२ पर्यंत आणखी १८ अणुप्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यातून वीजनिर्मिती क्षमतेमध्ये १३ हजार ८०० मेगावॉटने वाढ होऊन अणुप्रकल्पांच्या वीजनिर्मितीची क्षमता २२ हजार ४८० मेगावॉटपर्यंत पोहोचेल, असे ‘न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’ने (एनपीसीआयएल) दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच गुजरातच्या काक्रापार येथे ७०० मेगावॉट क्षमतेच्या दोन अणुभट्ट्यांचे लोकार्पण केले. या दोन्ही अणुभट्ट्या स्वदेशी बनावटीच्या आहेत.
सध्या देशात २४ अणुभट्ट्या कार्यरत असून, त्यांची क्षमता ८ हजार १८० मेगावॅट आहे, अशी माहिती ‘एनपीसीआयएल’ने दिली. पंतप्रधान मोदी यांनी २२ फेब्रुवारीला दोन प्रकल्पांचे लोकार्पण केले, त्याआधी दोन दिवस हा प्रकल्प पश्चिम पॉवर ग्रीडला जोडण्यात आला. लोकार्पण केलेल्या दोन्ही अणुभट्ट्या ‘प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर’ आहेत. त्या अत्याधुनिक असून, त्यातील सुरक्षेच्या सुविधा जगामध्ये सर्वोत्तम आहेत, असेही ‘एनपीसीआयएल’ने म्हटले आहे.
या अणुभट्ट्यांचा आराखडा, उभारणीपासून त्या कार्यान्वित करेपर्यंतची प्रक्रिया ‘एनपीसीआयएल’ने केली आहे. यातील सर्व उपकरणे भारतीय असून, त्या कार्यान्वित करण्यामध्ये पूर्णपणे भारतीय कंपन्या व कंत्राटदारांचा वाटा आहे. त्यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’चे खरे चित्र यात दिसते, याकडे लक्ष वेधण्यात येत आहे. तामिळनाडूच्या कुडनकुलम येथे रशियाच्या मदतीने एक हजार मेगावॉट क्षमतेच्या चार अणुभट्ट्या उभारण्यात येत आहेत. राजस्थानच्या रावतभाटा व हरयाणातील गोरखपूर येथे येथे ७०० मेगावॉटच्या स्वदेशी बनावटीच्या चार अणुभट्ट्यांची उभारणी करण्यात येत आहे. गोरखपूर, कर्नाटकातील कैगा, मध्य प्रदेशातील चुटका आणि राजस्थानातील माही बन्सवरा येथे ७०० मेगावॉट क्षमतेच्या एकूण १० अणुभट्ट्या उभारण्याला मंजुरी देण्यात आली आहे.