रामटेकमध्ये पारवे की श्याम बर्वे ?

yongistan
By - YNG ONLINE

रामटेक लोकसभा मतदारसंघ
नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघ यंदा चांगलाच चर्चेत आला. या मतदारसंघात महाविकास आघाडीत कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही दावा केला होता. मात्र, कॉंग्रेसने आग्रह धरत माजी मंत्री आमदार सुनील केदार यांच्या कट्टर समर्थक रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शिंदे सेनेसमोर तगडे आव्हान उभे ठाकले होते. परंतु जातपडताळणी समितीने त्यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरविले आणि त्यांची उमेदवारी रद्द झाली. त्यामुळे कॉंग्रेसला धक्का बसला. परंतु पती श्याम बर्वेंच्या डमी उमेदवारीने तारले. आता कॉंग्रेसकडून श्याम बर्वे आणि शिंदेंच्या शिवसेनेने कृपाल तुमाने यांच्याऐवजी कॉंग्रेसमधून आलेल्या राजू पारवे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे दुरंगी लढत होईल, असे वाटत असतानाच कॉंग्रेसचे किशोर गजभिये यांनी बंडखोरी केल्याने आता तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसची ताकद मोठी आहे. त्यामुळे कॉंग्रेसने या जागेवर दावा केला होता. कारण या मतदारसंघातील सावनेर आणि उमरेड विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, काटोलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, तर हिंगणा आणि कामठी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेला विजयाची समान संधी आहे. मात्र, कॉंग्रेसचे नेते तथा माजी मंत्री सुनील केदार यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे. त्यामुळे त्यांनी या जागेसाठी जोर लावला आहे. 
या मतदारसंघातून शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी दोनवेळा प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, शिवसेनेत फूट झाल्याने तुमाने शिंदे गटात दाखल झाले होते. त्यामुळे त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल, असे बोलले जात होते. परंतु कॉंग्रेस पक्षाचेच आमदार राजू पारवे शिंदे गटात दाखल झाले आणि त्यांनाच या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. त्यामुळे दोन कॉंग्रेसच्या नेत्यांमध्येच ही लढत रंगणार आहे. राजू पारवे यांना विजयाची परंपरा राखण्याचा विश्वास आहे. परंतु त्यांच्यासमोर कॉंग्रेसचे तगडे आव्हान असणार आहे. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून लढलेले किशोर गजभिये यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली. ते अपक्ष मैदानात उतरले आहेत. त्यांना मागच्या वेळी साडेचार लाखांपेक्षा अधिक मते मिळाली होती. त्यामुळे त्यांचेही आव्हान असणार आहे.
जिल्ह्या परिषदेच्या 
कार्याचा बर्वेंना फायदा?
रश्मी बर्वे पारशिवनी तालुक्यातील टेकाडी जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्य असून याच टर्ममध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. तेव्हापासून त्या जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेत आल्या. त्यातच रश्मी बर्वे यांनी जि. प. अध्यक्षपदाच्या अडीच वर्षांच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्याचाही फायदा बर्वे यांना होऊ शकतो. 
दोन्ही उमेदवार नवखे
एकत्रित शिवसेना असताना येथून अनेकदा कृपाल तुमाने यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळविला आहे. परंतु यावेळी तुमाने यांच्याऐवजी शिंदेंच्या शिवसेनेने राजू पारवे यांना उमेदवारी दिली. महाविकास आघाडीत या भागात कॉंग्रेसचे माजी मंत्री आमदार सुनील केदार यांचे वर्चस्व आहे. त्यांनीच रश्मी बर्वेंच्या नावाचा आग्रह धरला. परंतु उमेदवारी रद्द झाल्याने त्यांचे पती श्याम बर्वे मैदानात राहिले आहेत. तेही नवखेच आहेत. त्यामुळे यावेळी दोन नवख्यात लढत रंगणार आहे.

यंदाची लढत
राजू पारवे : शिंदे गट शिवसेना
श्याम बर्वे : कॉंग्रेस
किशोर गजभिये : अपक्ष
शंकर चहादे : वंचित

रामटेक : २०१९ मधील चित्र
कृपाल तुमाने (शिवसेना) विजयी मते : ५९७१२६
किशोर गजभिये (काँग्रेस) मते : ४७०३४३
सुभाष गजभिये (बसप) मते : ४४३२७
किरण पाटणकर (वंचित आघाडी) मते : ३६३४०
विजयी उमेदवारांचे मताधिक्य : १२६७८३